आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा रुपयांत मिळते भरपेट जेवण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - आजच्या महागाईच्या काळात 15 रुपयांत चांगला नाष्टा मिळणे दुरापास्त झाले असताना बजाजनगर येथे मात्र अवघ्या 15 रुपयांत दज्रेदार व भरपेट जेवण मिळते, असे म्हटल्यास कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया साध्य करून दाखवली आहे जागृत हनुमान मंदिराच्या विश्वस्तांनी. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचा लाभ दीड हजारांच्यावर कामगार घेत आहेत.

वाळूज एमआयडीसीमुळे मराठवाड्याच्या विविध भागातून अनेक कामगार रोजगारासाठी परिसरात वास्तव्यास आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मिळेल ते कामे क रून कामगार पोटाची खळगी भरतात. दिवसभर काम क रून थकलेले हे कामगार अनेकदा भजी-पाव, वडा-पाववर गुजाराण करतात.

बजाजनगर येथे बाहेरगावहून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे. अनेक कामगार मित्रांसोबत रूम करून राहतात. काहीजण स्वत: जेवण तयार करतात. मात्र, सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. यामुळे अनेकांची जेवणाची गैरसोय होते. शिवाय कमी पैशात चांगले जेवणही मिळत नाही.

कामगारांची ही समस्या लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी जागृत हनुमान मंदिराच्या विश्वस्तांनी अवघ्या 15 रुपयांत गरमागरम व भरपेट जेवणासाठी अन्नछत्र सुरू केले. नाममात्र दरात मिळणार्‍या जेवणावळीत कामगारांच्या रांगा लागत आहेत. सध्या दीड हजार कामगार या सुविधेचा फायदा घेत आहेत. शिवाय येथून औरंगाबाद शहरात डबे पुरविण्यात येत आहेत.

26 जानेवारी 2005 रोजी 20 ते 22 सदस्यांनी सुरुवात झालेल्या या केंद्रावर सध्या दीड हजार कामगार जेवण करतात. त्यामुळे अन्नपूर्णेश्वरीतील जेवणावळीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी आता तीन हजार स्क्वेअर फूट जागेवर नवीन हॉल बांधण्यात आला आहे. त्याचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. या ठिकाणी एमआयडीसीच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. अनिल पाटील, अध्यक्ष विश्वस्त समिती, अन्नपूर्णेश्वरी अन्नछत्र

दर्जाकडे लक्ष
अन्नपूर्णेश्वरीतील जेवणाचा दर्जा टिकवण्याकडे खास लक्ष दिले जाते. हे जेवण तयार करण्यासाठी 25 स्त्री-पुरुषांचा गट सकाळपासून राबत असतो.

वेतन व बोनसही
अन्नपूर्णेश्वरीतील जेवण तयार करणार्‍या कर्मचार्‍यांना वाळूज एमआयडीसीतील कंपन्यातील कामगारांप्रमाणेच वेतन, युनिफॉर्म, सुट्या, बोनस दिले जाते. त्यामुळे कर्मचारीही मन लावून काम करतात. महिन्याकाठी 6 लाखांवर उलाढाल होते.

शेकडोंची गर्दी
जागृत हनुमान मंदिरातील अन्नपूर्णेश्वरीत सकाळी 11 ते दुपारी 1:30 व सायंकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेदरम्यान जेवण दिले जाते. सकाळच्या वेळी जेवणासाठी कामगारांची संख्या कमी असते. मात्र, सायंकाळी कंपन्यांची शिफ्ट संपल्यानंतर येथे मोठी गर्दी होते. जेवणाचा दर नाममात्र 15 रुपये असल्यामुळे येथे जेवणार्‍यांची संख्या वाढत आहे.