आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात "बाई'च्या हट्टापुढे विद्यापीठ प्रशासनाने घेतले नमते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बालहट्ट आणि स्त्रीहट्टासमोर भल्याभल्यांना झुकावे लागते. अशीच एक घटना नुकतीच विद्यापीठात घडली. एका माजी विद्यार्थिनीच्या हट्टापुढे विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमते घ्यावे लागले. दंड न भरताही पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी या विद्यार्थिनीने पदवी विभागासमोर रडारड करीत ठिय्या मांडला. शेवटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनीच दंडाची रक्कम गोळा करून तिला डिग्री प्रदान केली.
११ फेब्रुवारीला पदवी शिक्षण पूर्ण झालेली माजी विद्यार्थिनी सुरुवातीला पदवी विभागात पदवी प्रमाणपत्र मागण्यासाठी पोहोचली. मात्र, पदवी प्रमाणपत्र नेण्यास उशीर झाला असल्याने दंड भरावा लागेल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले; परंतु आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगत या विद्यार्थिनीने रडायला सुरुवात केली. प्रभारी कुलगुरू बी. एस. भिसे यांच्या कक्षात जाऊन तिने गाऱ्हाणे मांडले. मी पदवी घेतली, पण नोकरी मिळाली नाही.
आता दंड भरायचा कुठून? असे स्पष्ट करून तिने दंड भरण्यास नकार दिला. पण पदवी घेतल्याशिवाय जाणार नाही, असा हट्ट धरून बसली. तासभर चाललेल्या या प्रकारामुळे कर्मचारी भांबावून गेले. त्यांनी स्वत:च पैसे गोळा करून या माजी विद्यार्थिनीचा दंड भरून पदवी प्रमाणपत्र प्रदान केले. ही विद्यार्थिनी निघून जाताच कर्मचाऱ्यांना हायसे वाटले.