आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टेबाजांच्या मते जास्त संधी असल्याने सेनेचा'भाव'कमी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दोन दशकांपासून युतीचीच सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत यंदा काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून शहरातील सट्टा बाजारही यासाठी सज्ज झाला आहे. अंतिम क्षणी चित्र स्पष्ट होते, त्यामुळे सोमवारी प्रचार संपण्यापूर्वी कोणाला किती जागा मिळणार यावर शहरात सट्टा लागणार आहे. सोमवारी पहिली फेरी असेल. त्यानंतर मतदानाच्या दिवशी दुपारी दुसऱ्या टप्प्यात तर मतमोजणीपूर्वी तिसऱ्या टप्प्यात बोली लावली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान १०० कोटी रुपयांची उलाढाल या सट्टा बाजारात होण्याची शक्यता आहे.

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीवर सट्टा लागतो. तसा तो लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही लागला होता. यावर कोण किती जिंकले अन् हरले याचा निश्चित आकडा कधीच मिळू शकत नसला तरी २५ ते ४० कोटी रुपयांपर्यंत या दोन्ही निवडणुकांत उलाढाल झाली होती. मनपा निवडणुकीत यापेक्षा जास्त उलाढाल होते. गेल्या निवडणुकीत (२०१०) सट्टा बाजारात ५० कोटींची उलाढाल झाल्याचे समजते. त्यामुळे या वेळी १०० कोटींच्या पुढे ही उलाढाल जाऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र अजून बोली लागली नसून ती प्रचार संपण्याच्या दिवशी सकाळपासून लागू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या वेळी बोली लागताना पैसे कमावण्यासाठी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकू शकतात, यावर पैसे लावले जातील. युतीच्या जागा किती येतील, यावर फारशी बोली लागणार नाही. शिवसेनेच्या किती जागा येतील, त्यात भाजप कोठे असेल अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे एमआयएम काय जादू करेल, यावर पैसे लावले जातील, असे सट्टा बाजारातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एमआयएम काय जादू करेल, यावर लावले जातील पैसे
ज्याच्या विजयाची शक्यता जास्त त्यावर जास्त पैसे लावले जातात. यालाच सट्टा म्हटले जाते. शहरात शिवसेनेच्या जास्त जागा येणार हे सट्टा बाजाराचे गणित सांगते. त्यामुळे सेनेवर जास्त पैसे लावले तर परतावा कमी येईल, हेही उघड गणित आहे. त्यामुळे सध्या सर्वाधिक पैसे एमआयएम या पक्षावर लागणार असल्याचे सांगितले जाते. एमआयएम हा पक्ष ३० जागांच्या आसपास जाईल, असे पूर्वी सांगितले जात होते. त्यामुळे एमआयएम ३० जागांपर्यंत जाणार की १५ जागांच्या आसपास थांबणार यावर सर्वाधिक पैसे लावले गेले आहेत. त्यापाठोपाठ देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपवर पैसे लागण्याची शक्यता असून २० च्या पुढे की १५ च्याही आत अशी बोली लागू शकते, असे दिसते.

बंडखोरांवर जास्तीची बोली
बंडखोर किती निवडून येतील, त्यातील सेनेचे किती असतील अन् भाजपचे किती असतील यावरही मोठी बोली लागू शकते. मोठ्या बंडखोरांच्या वाॅर्डांवरही बोली लागू शकते. त्याला किती प्रतिसाद मिळतो हे सोमवारीच समोर येईल. बंडखोरांची संख्या गतवेळप्रमाणेच म्हणजे १० ते १५ च्या घरात असणार आहे, मात्र ते बंडखोर कोण असतील, याची यादी सटोड्यांकडे असून त्यातील कोण किती मतांनी विजयी होतील, यावरही पैसे लावले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१० मध्ये असा लागला होता सट्टा
तेव्हा काँग्रेस सत्तेवर येऊ शकते, असे काहींना वाटले होते. त्यामुळे सट्टेबाजारांनी युतीच्या बाजूने जास्त पैसे लावले नाहीत. महापौरपदासाठी मात्र सट्टेबाजारांनी आधी काँग्रेस आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. परंतु जेव्हा अनिता घोडेले युतीकडून महापौरपदाच्या उमेदवार ठरल्या तेव्हा युतीचाच महापौर होईल, या बाजूने सट्टेबाजार होता. त्यात अनेकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तेव्हा नगरसेवकांची निवडणूक व महापौरांची निवडणूक मिळून किमान ५० कोटींची उलाढाल झाली असावी, असा कयास आहे.

यंदाचे चित्र
सत्तेत युतीच येणार अन् महापौरही युतीचाच होणार हे सट्टेबाजारांनी नक्की केले आहे. त्यामुळे त्यावर जास्त पैसे लावण्यास किंवा चर्चा करण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक किती येणार, भाजप किती संख्येपर्यंत थांबेल, बंडखोर किती असतील अन् एमआयएम हा नवा पक्ष किती जागा जिंकेल, यावर सट्टा लावला जाणार आहे.

निकालानंतर महापौर कोण, यावर लागेल सट्टा
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले, हे स्पष्ट झाल्यानंतर महापौर कोण होईल, यावर सट्टा लागेल अन् त्याची उलाढाल जास्त असेल. समजा शिवसेना मोठा पक्ष म्हणून समोर आला तर त्यांच्यातून कोण महापौर होऊ शकतो, यावर मोठ्या पैजा लावल्या जातील. भाजपचा महापौर होण्याची शक्यता कमी असल्याचे आज सांगण्यात येत असले तरी ऐनवेळी जर भाजपचे नगरसेवक वाढले तर उलाढालीची रक्कमही वाढू शकते, असे सूत्रांनी म्हटले आहे.