आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari Wind Up His Election Rally , Divya Marathi

भाषण ऐकण्यासाठी जेमतेम गर्दी पाहून अवघ्या ५ मिनिटांत गडकरींनी गुंडाळाली सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - राज्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या शैलीदार भाषणाने प्रचारसभा गाजवत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंगळवारी वैजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेला ४ तासांच्या प्रतीक्षेनंतर आले. मात्र, भाषण ऐकण्यासाठी जेमतेम गर्दी पाहून अवघ्या ५ मिनिटांत त्यांना सभा गुंडाळावी लागली. दरम्यान, नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी उशीर होत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले.

वैजापूर शहरातील डेपो रोडवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले होते. सभेच्या वेळेनुसार नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, ४ तासांच्या विलंबानंतर त्यांनी सभेला हजेरी लावली.

आपल्या ५ मिनिटांच्या भाषणात ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाची निवडणूक आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज झाले आहे. या कर्जाचे व्याज व मुद्दल याच्या परतफेडीत विकासकामासाठी बजेटमध्ये निधी शिल्लक राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रगतीमध्ये नंबर एकवर असलेला महाराष्ट्र आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे सहाव्या नंबरवर फेकला गेला आहे. वीज, पाणी, रस्ते, शेतीमालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, अशा बिकट परिस्थितीचे चित्र आघाडी सरकारने राज्यात निर्माण केले आहे. २५ वर्षांत जितका विकास झाला नाही, तो ५ वर्षांत आम्ही करू, यासाठी भाजपला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले व भाषण आटोपते घेतले.

भाजप उमेदवार एकनाथ जाधव यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली. वैजापूर तालुक्यात शिवसेना नसून वाणीसेना आहे. पंधरा वर्षांत त्यांनी काहीच विकास केला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे दिवसा कीर्तन व रात्री तमाशा करतात, अशी टीका त्यांनी या वेळी केली.

बीबीसीच्या सर्व्हेत भाजप अव्वल
विधानसभा निवडणुकीतील २८८ जागांपैकी भाजपचे १८५ उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा नुकतेच काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले जे. के. जाधव यांनी बोलताना केला. विशेष म्हणजे बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या निवडणूक सर्व्हेच्या तपशिलाच्या आधारे त्यांनी हा दावा केला.