आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन बारवालांनी नाकारली घरवापसी, पालकमंत्री कदम यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेने डावलल्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी महापौर गजानन बारवाल यांनी घरवापसी नाकारली. बारवाल यांनी पुन्हा शिवसेनेत दाखल व्हावे यासाठी पालकमंत्री रामदास कदम, संपर्क नेते विनोद घोसाळकर यांनी सोमवारी उशिरापर्यंत प्रयत्न केले. स्थायी समितीचे सदस्यत्व तसेच अन्य भरपाईही मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्यांनी भाजपसोबतच राहण्याचा निर्णय कायम ठेवला.

बारवाल यांना मुद्दाम डावलून गतवेळी बंडखोरी करणारे संजय बारवाल यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यामुळे बारवाल संतप्त झाले होते. म्हणून ते अपक्ष म्हणून रिंगणात राहिले अन् विजयी झाले. विजयी होताच आपण आता सेनेत जाणार नाही, भाजपसोबत राहू, असे त्यांनी जाहीर केले होते. बारवाल हे जुने शिवसैनिक असल्यामुळे त्यांचा राग दूर करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यास यश येईल, अशी सेना नेत्यांची अटकळ होती.

त्यामुळे झाले-गेले विसरून पुन्हा सन्मानाने पक्षात या, असे स्वत: पालकमंत्र्यांनी बारवाल यांना सांगितले; परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटपर्यंत त्यांच्याशी बोलणी करण्यात येत होती. मात्र, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सेनेसोबत येणार नाही, असे सांगितले.

सेनेकडून पदे मिळाली असती,
बारवाल हे सेनेत दाखल झाले असते तर त्यांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाबरोबरच अन्य पदे देण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी पक्ष मदत करेल, असेही आश्वासन देण्यात आले होते; परंतु त्यांनी भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. इकडे भाजपकडून त्यांनी कोणतेही मोठे पद मिळण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.