आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाडेंविरुद्ध तक्रार करणार्‍या कंत्राटदाराचे बिल मिळेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणारे कार्यकारी अभियंता गजानन खाडे पोलिसांच्या जाळय़ात अडकल्यानंतर फिर्यादी जयप्रकाश नारनवरे यांचे बिल अद्यापही मंजूर करण्यात आले नाही. असे असले तरी कंत्राटदाराने बिल मिळण्याच्या आशेपोटी त्या इमारतीचे काम सुरूच ठेवले आहे.

निलंबित खाडेंचा पदभार अद्याप दुसर्‍या अधिकार्‍याकडे सोपवण्यात आला नसल्यामुळे बिल काढण्यास विलंब होत आहे. सुमेध कन्स्ट्रक्शनचे नारनवरे यांना 14 फेब्रुवारी 2012 रोजी 3 कोटी 90 लाख 87 हजार 757 रुपयांच्या विद्यापीठातील मानसशास्त्र, संस्कृत विभागाच्या इमारतीचे काम देण्यात आले. काम जसजसे पूर्ण होईल तसतसे बिल सादर करण्याचे करारात नमूद करण्यात आले होते. नारनवरे यांनी सप्टेंबरमध्ये 76 लाखांचे बिल सादर केले. काम चांगले झालेले असतानाही खाडे यांनी टक्केवारीच्या रकमेसाठी त्रास देणे सुरू असल्याने खाडेंवर कारवाई सुरू आहे, मात्र सहआरोपी मुजीब यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नारनवरे यांनी केला आहे. ज्या इमारतीवरून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले त्या इमारतीचे काम सुरूच आहे. कनिष्ठ अभियंता गणेश पापुले हे काम पाहत आहेत. या संदर्भात मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, खाडेंच्या न्यायालयीन कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

खाडे प्रकरणाची गुरुवारी सुनावणी
गजानन खाडेंची सुनावणी गुरुवारी (26 सप्टेंबर) होणार आहे. मंगळवारी या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी 26 तारखेला सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात वाल्मीक शेवाळे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.