आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajanan Maharaj Co operative Society Aurangabad Scam

जुना घोटाळा, नवे वळण; गजानन महाराज पतसंस्थेचे दुसर्‍यांदा लेखापरीक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-5 भागात श्री गजानन महाराज नागरी पतसंस्थेची 15 वर्षांपूर्वी स्थापना करण्यात झाली. सुरुवातीला पतसंस्था चांगली सुरू होती, पण 2002 नंतर संस्थेच्या कारभाराला उतरती कळा लागली. गैरव्यवहाराचे आरोप लागले. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमण्यात आले. 2004 मध्ये झालेल्या पहिल्या लेखा परीक्षण अहवालात तत्कालीन अध्यक्ष डॉ. दामोदर चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. 9 लाख 54 हजार 941 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले. नंतर डॉ. चव्हाण यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाने घोटाळ्याचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे ठरवले. त्यानुसार संस्थेचे 2002 ते 2012 पर्यंत एकूण 10 वर्षांचे लेखापरीक्षण करण्यात आले. यात माजी अध्यक्ष डॉ. चव्हाण यांच्यासह माजी व्यवस्थापक दिलीप यादगिरे यांनादेखील जबाबदार धरण्यात आले.

तक्रार घेण्यास नकार
लेखापरीक्षण अहवालात यादगिरेंवर आरोप सिद्ध होताच संचालक मंडळाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर संचालक शरणाप्पा बिराजदार हे 24 जून 2013 रोजी सिडको एन-7 पोलिस ठाण्यात गेले. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे म्हणत पोलिस निरीक्षकांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणी न्यायालयात दाद मागावी, असा लेखी सल्ला 20 जुलै 2013 रोजी पाठवला. मात्र, पहिल्या अहवालाप्रमाणेच दुसर्‍या अहवालानुसारही कारवाई करण्यात यावी, अशी संचालकांची मागणी आहे.


पहिला अहवाल:
कालावधी: एप्रिल 2001 ते मार्च 2003
ऑडिटर: आर. आर. पटेल
आरोप: माजी संचालक डॉ. दामोदर चव्हाण (यांचे निधन झाले आहे) यांच्यावर ठपका

दुसरा अहवाल:
कालावधी: 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2012
ऑडिटर: जे. एन. विसपुते
आरोप: डॉ. चव्हाण यांच्यासह माजी व्यवस्थापक दिलीप यादगिरे यांच्यावर ठपका
अपहाराची रक्कम: 9 लाख 54 हजार 941 रुपये
डॉ. चव्हाणांवर गुन्हा दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट

यादगिरेंनी कायदा मोडला
माजी व्यवस्थापक यादगिरे हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्याकडून ही सगळी रक्कम वसूल केली पाहिजे. कारण कायद्याप्रमाणे फक्त 500 रुपये शिल्लक ठेवता येतात; परंतु 9 लाखांपेक्षाही जास्त रक्कम त्यांनी हातशिल्लक ठेवलीच कशी? हा खरा प्रश्न आहे. त्यांनी कायदा मोडला. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
-एस. ए. दीक्षित, सध्याचे व्यवस्थापक, गजानन महाराज नागरी पतसंस्था

काय म्हणतात संस्थेचे पदाधिकारी
व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंदवा
अपहार झालेला पैसा सार्वजनिक ठेवीचा आहे. त्याचा शोध लेखापरीक्षणात घेण्यात आला. यादगिरे यांनी पत्नी, भाऊ यांच्या नावावर 12 वर्षांपूर्वीच प्रत्येकी 75 हजारांचे कर्ज घेतले. ते अजूनही फेडले नाही. शिवाय घोटाळा केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.
-शरणाप्पा बिराजदार, संचालक

घोटाळ्याची रक्कम वसूल करावी
आमची संस्था एकेकाळी खूप चांगली होती; पण मधल्या काळात झालेल्या घोटाळ्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन झाली आहे. 9 लाखांपेक्षाही जास्त रक्कम थेट तिजोरीतून काढून नेली आणि त्यावर फक्त यादगिरे यांचीच सही आहे. खरा सूत्रधार यादगिरेच आहे. त्यांच्याकडून ही रक्कम वसूल झाली पाहिजे.
-एस. बी. अंभोरे, उपसंचालक

लेखापरीक्षण अहवालातील ठळक मुद्दे
सिडकोतील गजानन महाराज पतसंस्थेच्या पहिल्या लेखापरीक्षण अहवालात माजी अध्यक्षांना (त्यांचा मृत्यू झाला आहे) दोषी ठरवले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, नव्या संचालक मंडळाने दुसर्‍यांदा लेखापरीक्षण करून घेतले. त्यात संचालकांसह तत्कालीन व्यवस्थापकावरही ठपका ठेवण्यात आला. या आधारे व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा, असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, सिडको पोलिस तक्रार घेण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे हा दुसरा अहवाल बोगस असल्याचे व्यवस्थापकाचे म्हणणे आहे.

थेट सवाल: दिलीप यादगिरे, माजी व्यवस्थापक
- तुमच्यावर पैशांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे..
मी कोणताही अपहार केलेला नाही. संस्थेत 1987 ते 2009 अशी तब्बल 18 वर्षे प्रमाणिकपणे काम केले आहे.
- हातशिल्लक रकमेवर तुमची सही कशी?
त्यावर असलेली सही माझी नाही.
- ही तुमचीच सही असल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे..
हे खरे नाही. ही सही माझी मुळीच नाही.
- मग दोषी कोण आहे?
डॉ. चव्हाणांवरच पहिल्या ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
- पण दुसर्‍या अहवालात डॉ. चव्हाणांसह तुम्हालाही दोषी धरले आहे..
हे नव्या संचालक मंडळाचे षड्यंत्र आहे. सुडापोटी अंभोरे यांनी माझ्यावर राग काढला आहे.
- तुम्ही पत्नीच्या भावाच्या नावे घेतलेले कर्ज फेडले नाही..
मी सर्व कर्ज फेडले आहे. माझ्याकडे कोणतीही बाकी नाही. ही बँक श्रीधर वक्ते यांनी स्थापन केली. त्यांचा मी अत्यंत विश्वासू माणूस होतो. आताचे संचालक मंडळच अवैध आहे. त्यांचा ऑडिट रिपोर्टही बोगस आहे.