आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टेबाजीतील 'हिसाब' कोट्यवधींच्या घरात; डाळींच्या भावावरही सट्टा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील सुमारे पाच ते आठ हजार लोकांच्या मोबाइलवर दर सोमवारी ‘हिसाब हुवा क्या?’ असा मेसेज येतो. त्याचे उत्तर ‘हो’ असे दिल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी दोन व्यक्ती भेटतात. त्यांच्यात नजरानजर होते आणि काही न बोलता पैशाने भरलेले पाकीट आलेल्या व्यक्तीस दिले जाते किंवा तिच्याकडून घेतले जाते. दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. ही देवाणघेवाण असते सट्ट्याची. आलिशान जीवन जगणारे, व्यापार-व्यवसायातील तीन बडे बुकी या व्यवहाराचे नियंत्रण करतात. अगदी भारत-झिम्बाब्वे लढत असो की डाळींचे भाव, निवडणुकांचे निकाल, पावसाचा अंदाज या सा-यांवरच सट्टा लागतो.
चार एप्रिल रोजी आयपीएलवर सुरू असलेल्या सट्ट्याचा औरंगाबाद पोलिसांनी भंडाफोड केला. यात एकूण ११ बुकींना ताब्यात घेतले गेले. त्यांचे जबाब आणि पोलिस तपासातून औरंगाबादेतील बुकी आणि सट्टेबाजांचे एक वेगळे जग समोर आले. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने काही सट्टेबाज व बुकींशी बातचीत करून प्रत्यक्ष अनुभवही घेतला तेव्हा काही धक्कादायक बाबी लक्षात आल्या.

शहरात सट्टाबाजार नवा नाही. या व्यवहाराचे धागेदारे प्रामुख्याने अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, जयपूर आणि चेन्नईशी जोडलेले आहेत. रकमेची उलाढाल हवालामार्गे होते. काही वर्षांपूर्वी मटका सिस्टिम म्हणून ओळखला जाणारा जुगार आता डब्बा (मोबाइल) सिस्टिम म्हणून ओळखला जातो.

प्रत्येक सामना सेट आहे : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुकानात चाळिशीतील शेठ नोकरांना काम सांगत होता. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधींनी शेठसोबत गप्पांना प्रारंभ केला तेव्हा त्यांनी सट्ट्याचे विश्व उलगडले. ते म्हणाले, ‘क्रिकेटची तर बातच सोडा, प्रत्येक लढत बुकींकडून सेट असते. खेळाडूपासून सर्व काही मॅनेज असते. अहो, पावसालादेखील मॅनेज करता आले असते तर आम्ही तेही केले असते,’ असे म्हणत त्यांनी खिशातून मोबाइल काढून महिनाभरापूर्वीच्या आयपीएल लढतींचे मेसेज दाखवले. कोणत्या संघावर कशी बोली होती, कोणता खेळाडू किती धावांवर बाद होतो, त्यासाठी लागलेली बोली आणि त्यासाठी ठरलेले भाव हे सगळे त्या मेसेजमध्ये नमूद होते. आश्चर्य म्हणजे कोणत्या लढतीचा काय निकाल लागणार हे मेसेजमध्ये नमूद होते. आयपीएलच्या प्रत्येक लढतीला शहरातून किमान पाच कोटी रुपयांचा सट्टा लागला होता. त्यात काही जणांची लॉटरी लागली आणि अनेक जणांचे खिसे रिकामे झाले. शेठ सांगत होते, सट्ट्यामुळे अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो, पण बुकी कायम फायद्यात असतात.

गॅरंटरची गरज : सट्ट्याच्या खेळीत तुमच्या ओळखीची व्यक्ती (भिडू) आवश्यक आहे. त्याच्या गॅरंटीशिवाय नवा भिडू पैशाची बोली लावू शकत नाही.

औरंगाबादच्या बुकींचे जग
शहरातील बहुतांश वर्ग हा व्यापारी आहे. या व्यापा-यांमध्ये गप्पाच्या मैफली रंगतात. त्यातूनच वेगवेगळ्या विषयांवर पैजा लागतात. भुसार मालांचा भाव आणि व्यापारातील चढ-उतार इथून या विश्वाची सुरुवात होते. पैसा लावणारे आणि बुकिंग घेणारे बहुतांश व्यापारीच आहेत. नोकरीवाल्याचे हे काम नाही, असे बुकी सांगतात.

गल्लोगल्ली पंटर
सट्टा लावू इच्छिणा-यांना बुकीपर्यंत पोहोचवण्याचे काम 'पंटर' करतात. त्यांना व्यवहारावर अर्धा, पाऊण टक्का कमिशन मिळते. दोघांतील व्यवहार मोबाइलवरच चालतो. दर सोमवारी हिशेब होतो. घेणे-देणे सोमवारीच होते. दोन हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत बोली लावली जाते. सामन्याच्या अंतिम निकालावर, प्रत्येक ओव्हरवर किंवा कोणता खेळाडू किती धावा काढतो आणि कोणता गोलंदाज किती बळी घेतो या सगळ्या अंदाजांवर पैशाची बोली लागते.

पोलिसांनाही सुगावा
क्रिकेटच्या प्रत्येक मॅचवर सट्टा लागतो. सामना नसेल तर फुटबॉल, टेनिसवरही बोली लागते. मोंढ्यात डाळींच्या भावावरही बोली लागते. या सट्टेबाजीची खबर पोलिसांना नाही असे नाही. मात्र, प्रत्येक ठिकाणी सेटिंग होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...