आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्येचे दैवत: वर्गणीतून विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च; भोईवाड्यातील नवभारत गणेश मंडळाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बाप्पाच्या आराधनेत श्रीमंत आणि गरीब या दोन्ही वर्गातील गणेशभक्तांमध्ये उत्साह असतो. मुबलक पैशांच्या आधारे उत्सव साजरा करण्याबरोबर सामाजिक ऋण फेडणारी गणेश मंडळे अभावानेच आढळतात. धनदांडग्यांच्या गणेश मंडळांना तर हे सहज शक्य आहे, पण मजुरी करून कुटुंबीयांचा प्रपंच चालवणार्‍या गणेशभक्तांनी असे उत्तरदायित्व निभावणे हे विशेष आहे.! भोईवाडा येथील नवभारत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पैशांच्या बचतीतून गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचे ठरवले आहे.

पुण्या-मुंबईप्रमाणे औरंगाबादेतही सार्वजनिक गणेश मंडळांना ‘कॉर्पाेरेट’ स्वरूप आले आहे. ‘कॉर्पाेरेट’ मंडळांमुळे गणेशोत्सवाचे वैभव नक्कीच वाढले आहे, पण विद्युत रोषणाईसह चमक-धमक करण्यात उधळपट्टी करण्याऐवजी जमा पैशांचा विनियोग चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो हे नवभारत मंडळाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भांडीकाम करणार्‍या एका महिलेच्या मुलाचा शैक्षणिक खर्च भागवण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे. औरंगपुर्‍यातील शिशू विहार शाळेत इयत्ता पाचवीचे शिक्षण घेणार्‍या रोहन जाधवसाठी त्यांनी हे औदार्य दाखवले आहे. रोहनचे वडील बाळू जाधव हे तुटपुंज्या वेतनावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. बाळूच्या वेतनात प्रपंच भागवणे दुरापास्त झाल्याने रोहनची आई चार-पाच घरांची धुणीभांडी करून संसारासाठी हातभार लावते. दोघांच्या पर्शिमातूनही खर्च न पेलणारा असल्याने रोहनचे शिक्षण सोडण्याशिवाय त्यांच्यासमोर काहीच पर्याय उरला नव्हता. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील इंगोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन रोहनच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेण्याचे ठरवले. गणेशोत्सवातील विद्युत रोषणाई, डीजे आणि इतर व्यर्थ खर्च करण्याऐवजी दहावीपर्यंतचा सर्व खर्च आता मंडळ करणार आहे.

बचतीसाठी गणेशमूर्ती स्वत:च रंगवतात
बारा वर्षांपासून मंडळ कोरी गणपतीची मूर्ती खरेदी करत आहे. त्यानंतर घरी आणून विशाल बचके या कार्यकर्त्याच्या माध्यमातून मूर्तीवर रंगकाम केले जाते. रंगांचे दर गगनाला भिडल्यामुळे रंगवलेल्या मूर्तीही जादा दराने विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे 6 हजार रुपयांची साधी मूर्ती आणून त्यावर आकर्षक रंगकाम करण्यात येते. या माध्यमातून आणखी सात ते आठ हजार रुपयांची बचत मंडळ करते.

दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा
दर्जेदार शिक्षण घेण्याच्या जिद्दीपायी आईवडिलांनी रोहनला खासगी संस्थेत प्रवेश दिला आहे. पण अतिरिक्त शिकवणी वर्ग, शालेय शैक्षणिक शुल्क, पाठय़पुस्तक आणि इतर सर्व शालेय खर्च मंडळाच्या बचत खात्यातून केला जाणार आहे. रोहन हुशार असून मोठा झाल्यावर त्याला भारतीय प्रशासन सेवेत नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मंडळाने त्याच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभे केले आहे.

सर्वांनी असाच प्रयत्न करावा
भोईवाड्यात मजुरी करणारे आणि कामगारांचा वर्ग अधिक आहे. गणेशोत्सवाच्या वाढलेल्या खर्चात आपला सहभाग देण्याची त्यांची ऐपत नाही, पण मजुरांच्या उत्साहात तसूभर कमतरता राहत नाही. दरवर्षी बचतीचा मार्ग स्वीकारणार्‍या आमच्या मंडळाने यंदापासून पुढील पाच वर्षे रोहनच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
-सुनील इंगोले, संस्थापक, नवभारत गणेश मंडळ