आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी औरंगाबादकर सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे सोमवारी वाजत-गाजत आगमन होणार आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यारस्त्यावर भव्य सभामंडप उभारणीचे काम सुरू होते. अनेक ठिकाणी रोषणाई केली जात होती. शासकीय सुटीचा दिवस हेरून अनेकांनी एक दिवस अगोदरच गणेशमूर्ती तसेच सजावटीच्या साहित्याची खरेदी केली. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे दर 40 टक्क्यांनी वाढले आहेत. शहरात जवळपास 60 हजार मूर्ती दाखल झाल्या आहेत.

शहरातील टीव्ही सेंटर, आविष्कार कॉलनी, उस्मानपुरा, गजानन महाराज मंदिर चौक, औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदान, गुलमंडी येथे भाविकांनी गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. शहरात शाडू मातीच्या मूर्ती विक्रीसाठी दहा ठिकाणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी एक दिवस अगोदरपर्यंत जवळपास 80 टक्के इको-फ्रेंडली गणेशमूर्ती विकल्या गेल्याचे मैत्री ग्रुपच्या योगिता सातपुते यांनी सांगितले. त्यांचे सिडको एन-2 मध्ये झांबड टॉवर्समध्ये मूर्ती विक्रीचे केंद्र आहे. शाडू मातीच्या मूर्तीचे दर 151 पासून 751 रुपयांपर्यंत आहेत. त्या तुलनेत पीओपीच्या मूर्तींचे दर कमी आहेत. 25 रुपयांपासून 25 हजारांपर्यंत त्या मूर्ती विकल्या जात आहेत. शाडू मातीच्या मूर्ती पेण, नाशिक, अहमदनगर, नागपूर येथून आणण्यात आल्या आहेत. यंदा लालबागच्या राजाची मूर्ती छोट्या आकारात बाजारात आली आहे. त्याव्यतिरिक्त ‘बालगणेश’, ‘दगडूशेठ हलवाई’ आदी प्रकारच्या आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कुठे ?
शास्त्रीनगर हॉल
गारखेडा
त्रिमूर्ती चौक
गजानन महाराज मंदिर चौक
एकदंत गणेशालय
चिश्तिया चौक
टीव्ही सेंटर चौकातील स्टॉलवर

इको-फ्रेंडली मूर्तींचे दर जास्त
यंदा शाडू मातीच्या जवळपास 20 ते 25 हजार, तर पीओपीच्या 60 हजार मूर्ती दाखल झाल्या आहेत. इको-फ्रेंडली मूर्तींचे दर जास्त असल्याने बहुतेक जण पीओपीच्या मूर्तीकडे वळत असल्याचे चित्र आहे.
- नाना घाटी, मूर्तिकार व विक्रेते, अहमदाबाद

टीव्ही सेंटरच्या रस्त्यावर झुंबड
रविवारी हरितालिकेच्या पूजेचे साहित्य खरेदीसाठी गजानन मंदिर, टीव्ही सेंटर, गुलमंडी, मुकुंदवाडी, जाधववाडी मंडी आदी ठिकाणी महिलांची एकच गर्दी झाली होती. बाजारपेठेत ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणात दुकाने थाटली होती.

समाजोपयोगी उपक्रम राबवून करा आदर्श निर्माण
पर्यावरण संघटनांनी गणेश मंडळांना आवाहन केले आहे. या वर्षीचा उत्सव हा इको-फ्रेंडली व्हावा यासाठी भक्तांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आपल्या मंडळाकडून ध्वनिप्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत गणेश मंडळानी आदर्श निर्माण करावे, असे आवाहन मैत्री ग्रुप व इतर संघटनांनी केले आहे.