आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निझामकालीन गांधेली तलाव आटला..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निझामाच्या काळात बांधलेला आणि गांधेली-देवळाईसह 9 गावे, तांड्यांना पाणी पुरवणारा गांधेलीचा तलाव इतिहासात पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. सध्या तलावालगतच्या चार विहिरींना पाणी असले तरी मे महिन्यात हाही स्रोत कोरडा पडणार असल्याने भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. दुसरीकडे 96 एकरांत पसरलेल्या या तलावातील गाळ काढण्याच्या मात्र काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.

बीड बायपासवर औरंगाबादपासून अवघ्या 13 किमी अंतरावर गांधेली गाव आहे. या गावाच्या पाठीशी डोंगरांची रांग आहे. निझामकाळात या भागात सैन्याच्या तुकड्या काही काळ थांबत असत. त्यांच्या दाणा-पाण्यासाठी या भागात शेती होत असे. या शेतीला आणि पिण्याला पाणी मिळावे यासाठी निझामाने दोन डोंगरांना जोडणारी भिंत उभारून तलाव तयार केला. भिंतीपलीकडील डोंगरावरून वाहून येणार्‍या पावसाचा थेंब न थेंब या तलावात साठवला जायचा, आजही साठवला जातो. या तलावातून सध्या गांधेली, सिंदोण, भिंदोन, देवळाई, झाल्टा, बाळापूर, देवळाई म्हाडा, दुधना तांडा, बहिरोबा तांडा या गावे-तांड्यांना पाणीपुरवठा केला जातो. सुमारे 35 लोकसंख्येची तहान हा तलाव भागवतो.

गाळ काढणे आवश्यक
गाळ काढण्यासंदर्भातील हालचालींबाबत सरपंच सावंत म्हणाले, तलावातील गाळ काढण्याचे काम रोहयोचे आहे, पण ते अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाला मिळालेल्या नव्या निर्देशानुसार जेसीबी लावून गाळ काढला पाहिजे. यासंदर्भात लवकरच प्रशासनाला प्रस्ताव देणार आहोत. ए टू झेड ग्रुपकडून काही साहाय्य घेता येईल का याची चाचपणी सुरू आहे.

तीन डबकी, भेगाळलेली जमीन
भिंतीलगत तीन छोटी डबकी सोडली तर पाण्याचे नामोनिशाण नाही. पात्रात गवत उगवले आहे, तेही सुकत चालले असून जमिनीला भेगा पडत आहेत. सरपंच राहुल सावंत म्हणाले, इतिहासात पहिल्यांदाच तलाव कोरडा पडला आहे. सध्या या तलावालगतच्या चार विहिरींतील पाण्यावर गावांची तहान भागवली जात आहे. साधारणपणे अडीच, तीन तास पाणी उपसले जाते, पण आगामी काळात हेही पाणी संपण्याची भीती आहे.