आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पराभवाच्या चिंतनासाठी 53 पुरुष अन् एकच महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यातील 9 पैकी एकाच मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला. 8 ठिकाणी आपण का हरलो, यावर चिंतन करण्यासाठी शनिवारी गांधी भवनात आयोजित बैठकीकडे पाच पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. बंडखोरी, पक्षविरोधी कारवायांबरोबरच श्रेष्ठींनी केलेले दुर्लक्ष ही पराभवाची कारणे असल्याचे सांगण्यात आले, तर अशा बंडखोरांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी दिली.
औताडे यांच्या अध्यक्षतेखाली एक वाजेची बैठक अर्धा तास उशिरा सुरू झाली. बैठकीला फक्त 9 जण उपस्थित होते. बैठक संपली तेव्हा 53 पुरुष अन् मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षा सुनंदा कुदळे यांच्या रूपाने एकमेव महिला प्रतिनिधी असे 54 जण उपस्थित होते. लवकरच दोनदिवसीय चिंतन शिबिर घेऊन सविस्तर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया यांनी केली.
हे पराभूत होते अनुपस्थित
पूर्वचे राजेंद्र दर्डा, मध्यचे एम. एम. शेख, पश्चिमचे डॉ. जितेंद्र देहाडे, फुलंब्रीचे डॉ. कल्याण काळे व वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनाही बोलावण्यात आले होते; परंतु व्यग्रतेमुळे ते आले नसल्याचे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी सांगितले. ही बैठक ग्रामीणसाठी असल्यामुळे शहरातील पराभूत आले नसल्याने काहीही बिघडत नाही. शहरासाठी वेगळी बैठक होईल. त्या वेळी ते बोलतील, असे औताडे म्हणाले. उशीर आल्याने नामदेव पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही.
पराभूतांपैकी यांची हजेरी
पैठणचे रवींद्र काळे, कन्नडचे नामदेव पवार व गंगापूरच्या उमेदवार शोभा खोसरे यांचे पती जगन्नाथ खोसरे.
उपस्थितांमध्ये यांचा समावेश
नितीन पाटील, विलास औताडे, गजानन सुरासे, इब्राहिम पठाण, किरण डोणगावकर, काकासाहेब कोळगे, करीम पटेल, जयराम साळुंके, सुभाष देवकर, विनोद तांबे, बाबासाहेब पवार, करीम पटेल.
जिल्ह्यात दोनच नेते
जिल्ह्यात अनेक मातब्बर असले, तरी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाध्यक्ष औताडे हे दोनच नेते आहेत. बाकी सर्व बकवास आहेत, असे रावसाहेब नाडे यांनी सांगितले आणि टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.
पक्षात बंडखोरी झाली;श्रेष्ठींनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप
माझ्या मतदारसंघात दुष्काळ आहे. गावोगाव जाऊन मी पाहणी करतोय. त्यामुळे या चिंतन मेळाव्याला येऊ शकलो नाही. आता माझ्यासाठी दुष्काळ महत्त्वाचा. अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड.
पक्षात मोठी बंडखोरी झाली, पक्षविरोधी कारवाया अनेकांनी केल्या. अशांवर कारवाई झालीच पाहिजे. काही जण तर उघडपणे भाजपचे काम करत होते. आता ते पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेत आहेत. त्यांना पक्षातून काढून टाकले नाही, तर अशी सवय सर्वांनाच लागेल. श्रेष्ठींनीही उमेदवारांकडे लक्ष दिले नाही. त्यांनी थोडी मदत केली असती, तर कदाचित वेगळे चित्र असते.जगन्नाथ खोसरे, (पराभूत उमेदवार शोभा खोसरे यांचे पती).
अठरापगड जाती हा काँग्रेसचा पाया असून यापासून आपण दूर जात आहोत. हा पाया पुन्हा मजबूत करावा लागेल. एका पराभवाने पक्ष संपत नाही. नव्या जोमाने पुन्हा उभारी घेऊ. या वेळी बंडखोरांची गय केली जाणार नाही. पराभूत उमेदवारांनी त्यांचा अहवाल माझ्याकडे द्यावा. त्यावर माझे म्हणणे जोडून प्रदेशांकडे जातो. त्यांच्या मदतीने कडक शासन कसे होईल, याची खबरदारी घेतली जाईल. केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष.