आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - ‘आता गांधीजींचे चित्र असलेली नोट केवळ विनिमयाचे साधन ठरलेले नाही तर माणसे आणि मते खरेदी करण्याचेही ते साधन झाले आहे. खून करण्यासाठी आणि सुपारी देण्यासाठीही महात्मा गांधीजींच्या नोटांचा वापर केला जातो तसेच सरकारी कार्यालयांत गांधीजींच्या फोटोसमोर खोटी माहिती सांगतात.’ - हे निरीक्षण आहे नव्या पिढीचे. आजची तरुण पिढी गांधी विचारांकडे नव्या नजरेने पाहत आपले निरीक्षण नोंदवत असल्याची जाणीव करून देणारे ‘निबंधाची वही’ हे पुस्तक बुधवारी प्रकाशित होत आहे. त्यात हे निबंध आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासन केंद्रातर्फे गांधी जयंतीनिमित्त ‘आजच्या जीवनात गांधी विचारांची गरज’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असली तरी राज्यभरातून निबंध आले. त्यातील निवडक निबंधांचे पुस्तक अध्यासन केंद्राने ‘निबंधाची वही’ या नावाने प्रकाशित केले आहे. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. दासू वैद्य यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. बुधवारी गांधी पुण्यतिथीदिनी विद्यापीठात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मराठी विभागात दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यात निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण होणार आहे.
या पुस्तकाचे संपादक डॉ. दासू वैद्य म्हणाले की, परीक्षा पद्धती सुलभ करण्याच्या प्रयत्नात वस्तुनिष्ठ प्रश्नांची पद्धती सर्वत्र स्वीकारली जाताना दिसते. त्यामुळे एखादी संकल्पना स्पष्ट करणे, विश्लेषण, विवेचन करणे हा प्रकारच धोक्यात आला आहे. त्यामुळेच अशी निबंध स्पर्धा घेण्याचे ठरवले. उत्तम निबंध आले. त्यातून काही निवडक निबंध या पुस्तकात घेतले आहेत. त्यावरून नवी पिढी गांधी विचारांकडे नव्या दृष्टिकोनातून कशी बघते हे दिसून येते.
फक्त भिंतीवरच चित्रे
गांधीजींचे चित्र नोटांवर छापले जात आहे. तसेच गांधीजींचे चित्र सरकारी कार्यालयांच्या भिंतीवरही लावण्यात आले आहे. त्यामुळे गांधी दर्शन घेऊन भ्रष्टाचार करण्यासाठी कर्मचारी मोकळे झाले आहेत. आता गांधीजींची नोट केवळ विनिमयाचे साधन उरलेले नाही, तर माणसे आणि मते खरेदी करण्याचेही ते साधन झाले आहे.
रचना शिंदे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
भविष्यकाळ अंधारमय
आजच्या जागतिकीकरणाच्या आवेगात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपभोगाच्या व चंगळवादाच्या भोवर्यात समाज अडकलेला आहे. यासाठी निसर्गाचीही अर्मयाद लूट चालू आहे. आजच्या मजेसाठी उद्याचा भविष्यकाळ अंधारमय होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठीच गांधी विचारांची आज गरज आहे.
क्षितिजा भूमकर, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग, विद्यापीठ
खादी वापरायला हवी
जेव्हा भारतातील गरीब शेतकर्यांजवळ अंग झाकण्यापुरते कापडही नाही हे पाहिले तेव्हा स्वत:ही खादीचे कपडे घालायला सुरुवात केली. दररोज नाही पण किमान एक दिवस तरी आपण खादीचे कपडे वापरायला पाहिजेत. त्यामुळे चरख्यावर चालणार्या लघुउद्योगांचा व्यवसाय वाढेल.
अमृता कुलकर्णी, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद.
गांधीजींच्या विचारांवर विद्यार्थ्यांनी केलेले भाष्य
समानतेचे सूत्र
स्त्री- पुरुष समानता आणण्यासाठी आम्ही जरी प्रयत्न करत असलो तरी आमच्या हाती काहीच लागत नाही; पण साध्या शब्दांत गांधीजी इथेही समस्येवर मात करतात. मुलीचा वाटा मुलाइतकाच असला पाहिजे. पत्नी ही दासी नव्हे, भागीदारीण आहे, असे ते सांगत.
स्वामी बोबडे, मराठी विभाग, विद्यापीठ
नीतिमत्तेचे पाझर तलाव
सुखसाधनांचा गुणाकार करण्याचे काम करणारी यंत्र संस्कृती मानवाचे सत्त्वहरण करीत आहे. जीवनाचा पोत सुधारण्यासाठी, धूप थांबवण्यासाठी संयमाचे बंधारे आवश्यक आहेत. फिनिक्स, साबरमती, सेवाग्राम येथील गांधीजींचे आर्शम सामाजिक नीतिमत्तेचे पाझर तलाव होते. समाजभूमी संपन्न करणारी आर्शमव्रते त्यातून झिरपत राहिली.
हनुमान ढाळे, वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा, जि. बीड.
हक्कांपेक्षा अधिकारांवर भर
गांधीजींना कोणत्याच प्रकारची सक्ती मान्य नव्हती व सक्ती करणारी संस्था म्हणून राज्य संस्थेविषयी त्यांना फारसा आदर नव्हता. व्यक्तीचा स्वयंनिर्णय त्यांना मान्य होता व राज्याच्या सक्ती करण्याच्या अधिकारामुळे त्याला बाधा येते, असे त्यांना वाटे. व्यक्तीला आत्मा आहे; परंतु राज्य हे आत्मा नसलेले यंत्र आहे. त्यांनी हक्कांइतकाच किंबहुना त्याहून जास्त भर अधिकारांवर दिला.
रमेश राऊत, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड
घराणेशाही चालवली नाही
गांधीजींनी विचार केला असता तर ते जगातील सर्वात मोठी नोकरी करू शकत होते; पण त्यांनी तसे केले नाही. तसेच त्यांनी कधीही कोणाची शिफारस केली नाही. आर्शमासाठी किंवा पक्षासाठी मोठी देणगी घेतली नाही. ते मोठमोठय़ा उद्योगपतींचे पाहुणे झाले; पण त्यांनी असे कधीच म्हटले नाही की, हरीला इथे, रामाला तिथे नोकरी लावून द्या. मोठय़ा कुटुंबातील असूनही गांधीजींनी घराणेशाही चालवली नाही.
सुंदर तांबे, वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा, जि. बीड.
नीती भ्रष्ट व कुटिल
आजचे बदलते राजकारण आणि वाढता भ्रष्टाचार यांचा एक परस्पर सहसंबंध आहे; पण आजचे बदलते राजकारण गांधी विचारांना थारा देत नाही. आजच्या राजकीय लोकांची नीती कुटिल व भ्रष्ट झाली आहे. ते आज मातीही खायला मागे-पुढे पाहत नाहीत. म्हणून आजच्या राजकारणाला गांधी विचार सहमत नाहीत.
संजय धाबे, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.