आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दरबार गणेशाचा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाची 400 पेक्षा जास्त आकर्षक रुपे पाहावयाची असल्यास शहरातील चिटगोपेकरांचे घर हे गणेशभक्तांसाठी पर्वणी ठरेल. देशविदेशातून जमा केलेल्या आकर्षक मूर्तीचा येथे खजिनाच आहे. तीन गणेश मूर्तीपासून सुरू झालेला त्यांचा छंद आज 400 मूर्तीपर्यंत येऊन पोहचला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. प्रमोद चिटगोपेकर यांनी गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती संग्रह करण्याचा छंद जोपासला आहे. गेल्या 30 वर्षांत त्यांनी देश-विदेशांतून वैशिष्ट्यपूर्ण अशा 400 मूर्ती गोळा केल्या आहेत. आपल्या या वैविध्यपूर्ण मूर्तीची माहिती लोकांना व्हावी यासाठी त्यांनी याचे प्रदर्शन सुद्धा भरवले आहे. पावित्र्य आणि प्रेरणा देणारा खजिना चिटगोपेकर यांनी जपला आहे.

रेडीच्या गणपतीमुळे जडला छंद
बीदर जिल्ह्यातील चिटगोप या गावाचे रहिवासी असणारे डॉ. प्रमोद चिटगोपेकर हे व्यवसायाने डॉक्टर. शासकीय वैद्यकीय सेवेत दाखल झाल्यानंतर 1981-82 मध्ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. येथे नोकरी करत असताना वेंगुर्लाजवळच्या रेडी बंदराला भेट दिली. मँगनीज खाणीसाठी प्रसिद्ध असणार्‍या या गावी जागृत गणपतीचे मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. चिटगोपेकर एकदा सहपत्नी या गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. जांभ्या खडकात कोरलेली सहा फूट उंचीची मूर्ती पाहून पती-पत्नी प्रभावित झाले. याचवेळी त्यांच्या मित्रानी त्यांना गणपतीच्या तीन मूर्ती भेट दिल्या. चंदनाच्या लाकडापासून तयार केलेल्या या तीन मूर्ती शुभ संकेत मानत चिटगोपेकर यांनी मूर्ती संकलन करण्यास निर्णय घेतला. सुरुवातीला 101 गणेशमूर्तींचा संग्रह करण्याचा विचार त्यांनी केला होता, पण पुढे हा आकडा वाढत गेला.

विविध ठिकाणांहून जमवल्या मूर्ती
चिटगोपेकर यांनी गणेशमूर्ती जमवण्याचा ध्यास घेतल्यानंतर विविध ठिकाणांहून त्यांनी गणेशमूर्ती गोळा केल्या. भारतातील विविध गावे, दुकान, प्रदर्शनातून त्यानी गणेशाच्या मूर्ती संकलन करण्यास सुरुवात केली. मूर्तीची निवड करताना वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वसाधारणपणे सहजासहजी पाहण्यात नसलेल्या मूर्तीचा संग्रह करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. सध्या चिटगोपेकरांच्या संग्रहात 400 गणेशमूर्ती आहेत. या कामात त्यांना कुटुंबीयांनी मोठी मदत केली आहे. चिटगोपेकर यांनी कन्याकुमारी, केरळ, काश्मीर, सिमला, कुल्लू मनाली, भुवनेश्वर, द्वारका, सोमनाथ इत्यादी ठिकाणांहून मूर्ती आणल्या आहेत. या व्यतिरिक्त पर्यटनासाठी नेपाळ, युरोप, थायलंड, मलेशिया, सिंगापूर इत्यादी ठिकाणी गेले असताना तेथून त्यांनी 20 ते 25 मूर्ती आणल्या आहेत.

विविधरूपी आकर्षक मूर्ती
चिटगोपेकर यांच्या संग्रहातील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे कोणतीच मूर्ती एकसारखी नाही. प्रत्येक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असेल हे प्रमाण त्यांनी कटाक्षाने पाळले आहे. या संग्रहात त्यांच्याकडे गणपतीची विविध रूपे धारण केलेल्या मूर्ती आहेत. यात र्शीफळ, सुपारी, मंगल कलशातील, चांदीच्या पाच मूर्ती आहेत. तसेच भगवान विष्णू रूपातील गणेश, कृष्णरूपी, हनुमान, नारद, भगवान शंकर, नटराज, गणेश वाद्यवृंदरूपी, रुद्राक्ष, मुषकारूढ, अन्य वाहनांवरील गणेश, रथारूढ शेषरूढ, रामरूप, बटूवेशातील गणपती आहेत.

5 ग्रॅम ते 12 किलोंचे गणराज
संग्रहातील सर्वात लहान मूर्ती ही तांब्याची असून ती 5 ग्रॅम वजनाची आहे, तर सर्वात जास्त वजनाची मूर्ती 12 किलोंची आहे. दगड, टेराकोटा, तांबा, पितळ, फायबर, शिशम, संगमरवर, व्हाइट मेंटल, काच मिर्शधातू, गनमेंटल, बोनचायना, चांदी, सोने, चंदनाचे लाकूड, ब्राँझधातू अशा विविध वस्तूंचा वापर करत गणेशाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

घरातील गणेश दरबार
गणेशाच्या 400 मूर्ती अगदी व्यवस्थितरीत्या जपून ठेवल्य आहेत. गणेशमूर्ती ठेवलेल्या खोलीला त्यांनी ‘गणेश दरबार’ असे नाव दिले आहे. अनेकांना संग्रहाची माहिती असल्याने नागरिक आणि नातेवाईक पाहण्यासाठी येतात. त्यांनी केलेल्या संग्रहाची नोंद म्हणून गणपतीच्या जगभरातील मूर्तींची माहिती असलेला ‘गणेश कोशातही’संग्रह केलेल्या गणेश मूर्तीची माहिती आहे. चिटगोपेकर यांनी जोपासलेल्या संग्रहातील गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्ये समाजाला कळावे यासाठी त्यांनी संग्रहाचे प्रदर्शन भरवले होते. आता पर्यंत त्यांनी तीन वेळा प्रदर्शन भरविले आहे.

खजिना
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून गणपतीला प्रत्येक घरात मानाचे स्थान आहे. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने होते. हिंदू धर्मात प्रथम पूज्य असलेल्या गणेशाची जगात विविध रूपे पाहावयास मिळतात. शहरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. प्रमोद चिटगोपेकर यांनी गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती संग्रह करण्याचा छंद जोपासला आहे.