आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायाच्या आगमनाचे वेध; आराशीच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलली, ढोल-ताशे विक्रीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने तयारीलाही वेग आला आहे. गणेश मंडळे, व्यापारी यांच्यासह पोलिस प्रशासनही कामाला लागले आहे. प्रमुख चौकांत मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडपांची उभारणी पूर्ण झाली असून गणेश मंडळे आता आरास आणि मंडप सजवण्याच्या कामाला लागले आहेत. गणेशोत्सवात खबरदारी म्हणून पोलिसांनी महिला छेडछाडविरोधी पथकाचीही नेमणूक केली आहे.

गणरायाच्या आगमनासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. मूर्तिकारांचे गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. विविध रंग आणि रूपांतील गणेशमूर्तींनी बाजारपेठ फुलून दिसत आहे. बप्पाची आरास करण्यासाठी बाजारात थर्माकोलपेक्षा फुलांच्या आराशीला महत्त्व दिले जात असल्याने यंदा फुलांची मागणी वाढणार आहे. यंदा बाजारात मोठय़ा प्रमाणावर झेंडू व शेवंतीची फुले उपलब्ध होणार आहेत. झेंडूचा दर 30 ते 40 रुपये किलो, तर शेवंतीचा दर 100 ते 120 रुपये किलो राहण्याची शक्यता फुलांचे व्यापारी मदनराव शिंदे यांनी व्यक्त केली. बाजारपेठेत ढोल-ताशांची दुकानेही सजली आहेत. 60 रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत ढोल व ताशे उपलब्ध आहेत. साधारणत: 300 ते 500 रुपयांपर्यंतच्या ढोलला अधिक मागणी असते, असे ढोल विक्रेते सचिन कावळे यांनी सांगितले.