आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी निविदेविना 19 लाखांची विहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुकुंदवाडीत 40 फूट व्यासाची आणि तेवढीच खोल विहीर बांधली जात आहे. मात्र, अंदाजपत्रकात या विहिरीचा खर्च 19 लाख रुपये दर्शवण्यात आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. निविदा काढून बांधकाम केले असते तर ते कमी खर्चात झाले असते, असा सूर जाणकार काढत आहेत.

संघर्षनगर, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी या भागांत तीन विहिरी आहेत. तिन्ही ठिकाणी शाश्वत पाण्याचे स्रोत आहेत. या विहिरींचा उपयोग गणेशमूर्ती विसर्जनासाठी होऊ लागला आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने या विहिरी निर्माल्य आणि कचर्‍याने भरल्या असून येथे विषारी वायू निर्माण झाला. गेल्या वर्षी मुकुंदवाडीतील विहिरीची स्वच्छता करताना तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. ही बाब लक्षात घेत मनपाने भव्य विहिरी खोदण्यास सुरुवात केली, पण तिजोरीत ठणठणाट असताना इतका खर्च करण्याची गरज काय, असा सवाल पदाधिकारी विचारत आहेत. हडकोतही 16 लाख खर्चून विहिरीचे बांधकाम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विहीर बांधण्यात येत असून 17 तारखेला सभेची मंजुरी घेतली असल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले.

खर्च वाचला असता
आयुक्तांच्या विशेषाधिकाराचा वापर करून निविदा न काढता विहिरीचे बांधकाम सुरू आहे. निविदा काढल्या असत्या तर कमी खर्चात काम झाले असते.

या भागांना होणार फायदा
मुकुंदवाडी, जयभवानीनगर, न्यू एसटी कॉलनी, अंबिकानगर, संतोषीमातानगर, क ासलीवाल, संजयनगर, शिवाजी कॉलनी, रोहिदासनगर या भागातील 125 गणेश मंडळांचे व 700 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन येथील विहिरीत करता येईल.

ही तर आवश्यक बाब
>विसर्जनासाठी नवीन विहीर होणे आवश्यक होते. विसर्जनानंतर दरवर्षी विहिरीची तत्काळ स्वच्छता करण्यात येईल. या विहिरीमुळे पाण्याचा प्रश्न सुटेल. -नारायण कुचे, सभापती, स्थायी समिती.

>मोठय़ा प्रमाणात खर्च झालेली ही पहिलीच विहीर असावी. या रकमेत छोटा तलाव झाला असता. भ्रष्टाचार झाल्याची शंका आहे. तीन दिवसांत संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येईल.
-डॉ. जफर खान, विरोधी पक्षनेते, मनपा.

> विहीर बांधकामाचा निर्णय नागरिकांचे हित समोर ठेवून घेण्यात आला आहे. खर्च झाला तरी मोठी विहीर होणे काळाची गरज आहे.
-गोकुळ मवारे, प्रभारी आयुक्त, मनपा.

>बांधकाम साहित्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. 40 फूट खोली आणि तेवढाच व्यास असेल तर त्या विहिरीच्या बांधकामासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे.
-सी. एस. सोनी, माजी शहर अभियंता.