आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिऊ नका म्हणणारेच पितात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत येथे दारू पिऊ नका म्हणून सूचना करणारे स्वत:च त्या दिवशी दारूच्या नशेत तर्र असतात हे पाहून वाईट वाटते. ठामपणे दारू न पिणे दाखवून दिल्यास यंदा त्या मंडळाला पोलिसांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शुक्रवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केली.

पोलिस आयुक्तालयाच्या अलंकार सभागृहात झालेल्या या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सुभाष झांबड, एम. एम. शेख, महापौर कला ओझा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे आयुक्त म्हणाले की, प्रत्येक मंडळातील सदस्यांनी विद्युत तारेच्या उंचीपेक्षा आपल्या वाहनाची सजावट कमी ठेवल्यास मोठय़ा अपघातांपासून बचाव होऊ शकतो. गतवर्षी सिटी चौकात बाहेरून आणलेल्या एका वाद्य वाहनाच्या चाकाखाली सापडून एकाचा बळी गेला होता. या वर्षी बाहेरच्या अशा कोणत्याही वाहनाला परवानगी देण्यात येणार नाही.

गणेशोत्सवाच्या काळात महिला व तरुणींशी गैरवर्तन करणार्‍या रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी परिमंडळ 1 व 2 आणि गुन्हे शाखा पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. महाविद्यालयाच्या परिसरात होणार्‍या छेडछाडीला आळा घालण्यासाठी महिला सुरक्षा समितीची जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणीत 50 टक्के महाविद्यालयीन तरुणींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयाच्या आवारातच देवगिरी आणि मौलाना आझाद महाविद्यालयातील रोमिओंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीच्या रस्त्यावर भंडार्‍याचा कार्यक्रम न ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच दारू पिऊ नका म्हणणारेच मिरवणुकीच्या स्टेजवर दारू प्यायलेल्या अवस्थेत दिसून येतात, याचे वाईट वाटते.

ठामपणे आम्ही तपासणी केल्यानंतर एखाद्या मंडळाने दारू प्राशन न केल्याचे आढळून आल्यास त्या मंडळाला पोलिसांच्या वतीने पारितोषिक देण्याचे त्यांनी बैठकीत जाहीर केले. प्रारंभी खासदार खैरे व सर्व आमदार, महापौर, शांतता समितीचे सदस्य आदींनी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विसर्जन विहिरींची सफाई करणे, जीटीएलने वीजपुरवठा सुरळीत करणे, पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास न देणे आणि आरटीओतर्फे व्यवस्थितरीत्या वाहनांची तपासणी करणे आदी सूचना मांडल्या. बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकारी, शहर, छावणी, वाळूज महानगर व नवीन औरंगाबाद आदी महासंघांच्या पदाधिकार्‍यांसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

आमदार जैस्वाल यांनी दिला ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा दाखला
आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या सूचना मांडताना ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झालेल्या बातमीचा दाखला दिला. सरस्वती भुवन शाळेच्या दोन विद्यार्थिनींची शाळेतच एका बाहेरील अनोळखी तरुणाने छेड काढली. तिने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतल्याने मोठा अनर्थ टळला, असा उल्लेख करून अशा घटना यापुढे घडू नयेत याची पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.