आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival Noise Pollution Issue At Aurangabad

पो‍लिस मोजणार दणदणाट: ६५ डेसिबल आवाजाची मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सवात ढोल-ताशांचा गजर आणि डीजेची धम्माल असते. परंतु यंदा पोलिस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश मंडळांवर करडी नजर ठेवणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील सर्वच डीजेधारकांना नोटिसा बजावल्या असून मंडळांना ६५ डेसिबल आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन ध्वनिमापक यंत्रे ठेवली जाणार आहेत.
गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाने सामान्य नागरिक, रुग्णांना बराच त्रास होतो. पण पोलिस कारवाईबाबत गंभीर नाही, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ध्वनिप्रदूषण मोजणारी यंत्रेच नसल्याने या गोंगाटावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते. यंदा मात्र आवाजाची मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई होणार आहे. शहराचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १२ पोलिस ठाण्यांत कारवाईसाठी पथक कार्यरत राहणार आहे. यात प्रत्येकी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ध्वनिप्रदूषण मोजण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. सार्वजनिक ठिकाणी डीजेला ६५ डेसिबलची मर्यादा घालून दिली असून पोलिसांचे पथक वॉर्डावॉर्डांत जाऊन दररोज आवाजाची तीव्रता मोजून तो अहवाल उपायुक्तांना पाठतील. पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाबाबत डीजेधारक, गणेश मंडळांसाठी सुधारित नियमावली तयार केली आहे.
१०० नंबरवर करा तक्रार
सामान्य नागरिक, दवाखान्यातील रुग्णांना आवाजाचा त्रास होत असल्यास थेट १०० या पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर ध्वनिप्रदूषणाची तक्रार करता येणार. त्याची तत्काळ दखल घेतली जाईल, अशी ग्वाही पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी दिली.
एक लाख दंड, पाच वर्षे शिक्षा
पर्यावरण खाते व प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली खूप कडक आहे. यात मोठ्या शिक्षेची तरतूद आहे. पण आजवर कधी अंमलबजावणी झालेली नाही. ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्यास किंवा ध्वनिप्रदूषण झाले तर पाच वर्षांची सक्तमजुरी व एक लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे.
पोलिस करतात तांत्रिक काम
पर्यावरण कायदा १९८० व प्रदूषण नियंत्रण मंडळ कायदा २००० च्या ५/९ प्रमाणे ध्वनिप्रदूषणाबाबत कारवाई करता येते. पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नसल्याचे पोलिस अधिकारी खासगीत म्हणतात. तर कायद्याचे काम आऊटसोर्स करता येत नसल्याचे परदेशी यांनी म्हटले.
अशी होणार शिक्षा
*तक्रार आली नाही तरी पोलिस वॉर्डा-वॉर्डांत जाऊन ध्वनिप्रदूषण मोजणार
* ध्वनिमापक यंत्राद्वारे आवाजाची मोजणी
* आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पंचनामा केला जाईल
* अहवाल उपायुक्तांकडे सोपवला जाईल.