आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1400 गणेशमूर्तींच्या निर्विघ्न विसर्जनासाठी 5 हजार पोलिस, रोड रोमिओ पथक असणार तैनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा बारा दिवस मुक्कामासाठी असणाऱ्या लाडक्या गणरायाला मंगळवारी (५ सप्टेंबर) निरोप देण्यात येणार आहे. १४०० मंडळांत स्थापन झालेल्या मूर्तींचे विविध ठिकाणी विसर्जन होईल. यानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका जल्लोषात आणि सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
त्यातील निम्म्यापेक्षा अधिक पोलिस मुख्य म्हणजे संस्थान गणपती ते जिल्हा परिषद मैदानापर्यंत निघणाऱ्या मिरवणुकीवर लक्ष ठेवतील. त्यात एक हजार विशेष पोलिस अधिकारी, ७०० एनएसएसचे स्वयंसेवक आणि ५०० एनसीसीचे विद्यार्थीही असतील. गणेश महासंघ आणि गणेश मंडळाचे स्वयंसेवकही यंदा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणार आहेत, अशी माहिती पोलिसांच्या जनसंपर्क विभागातर्फे सोमवारी देण्यात आली. गेल्या वर्षी एकूण ३००० जणांचा बंदोबस्त होता. 
 
संस्थान गणपतीपासून दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य मिरवणूक निघणार अाहे. ती सिटी चौक, गुलमंडीमार्गे औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीजवळ समाप्त होईल. याशिवाय सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, वाळूज, दौलताबाद, हर्सूल या भागांतही स्वतंत्र मिरवणुका निघतील. सर्वच ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. मंडळांनी निर्धारित वेळेतच मिरवणुकांना प्रारंभ करावा, अशी विनंती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी केली 
 
येथे पार्किंगची सोय 
आमखास मैदान, किलेअर्क, समर्थनगर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, तापडिया नाट्यमंदिर, टीव्ही सेंटर येथे एम-२ येथील फरशी मैदान, टीव्ही सेंटर येथील भारतमाता मैदान, पोलिस अधीक्षक कार्यालय, मुकुंदवाडी परिसरात औरंगाबाद जिमखाना परिसर येथे गणेशभक्तांना वाहने ठेवून मिरवणूक पाहण्यासाठी जाता येईल. 
 
या ठिकाणी वाहने टाळा 
संस्थानगणपती, शहागंज, सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट, नूतन काॅलनी, टीव्ही सेंटर चौक, मुकुंदवाडी, गजानन महाराज मंदिर चौक, वाळूज बजाजनगर मुख्य रस्ता या भागात दुपारनंतर गाडीने जाणे टाळावे. 
 
सडक सख्याहरी पथक 
युवती, महिलांची छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी तीन सडक सख्याहरी पथके स्थापन करण्यात आली आहेत. 
 
असा असणार बंदोबस्त 
पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, ४१ पोलिस निरीक्षक, ११८ सहायक निरीक्षक, २२५६ पोलिस, ५०० होमगार्ड, एसआरपीएफची एक कंपनी, एक हजार विशेष पोलिस अधिकारी, ७०० एनएसएस, ५०० एनसीसी कॅडेट. 
 

लहान मुलांना सांभाळा : लहान मुलांना विसर्जन मिरवणुकीत नेणार असाल तर काळजी घ्या. त्याच्या खिशात घरचा पत्ता आणि आईवडिलांचा मोबाइल क्रमांक असलेली चिठ्ठी ठेवा. अशा प्रकारे हरवलेल्या मुला-मुलींची माहिती देण्यासाठी सिटी चौक पोलिस ठाण्यात माहिती केंद्र स्थापन करण्यात आहे. कुठलीही अडचण आल्यास ०२४०- २२४०५०० या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. 
बातम्या आणखी आहेत...