आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणाचा गणरायाला जलाभिषेक,११०० सार्वजनिक मंडळांसह लाखो गणेशभक्तांनी दिला ‘श्रीं’ना निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात पुढे पुढे सरकत होत्या. रस्ते गर्दीने फुलून गेले. सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला. बाप्पांसमोर पावली पथके, ढोल-ताशे तालात वाजत असताना मंडळाचे कार्यकर्ते गणेशभक्तांची पावले थिरकत होती. गुलाल पुष्पांच्या उधळणीसोबत पावसाची मुक्त उधळण सुरू झाली. वरुणराजाने गणरायाला जलाभिषेक केला. पावसामुळे बघ्यांची गर्दी थोडी अोसरली, पण कार्यकर्त्यांचा जोश पावसांच्या दमदार सरींबरोबरच वाढत होता. शहरातील ११०० सार्वजनिक गणेश मंडळांसह लाखो भक्तांनी गणरायाला निरोप दिला. दरम्यान, आज (शुक्रवार) छावणीत अत्यंत उत्साहात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
गुरुवारी दुपारी बारा वाजता ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या गणेशरथाने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तब्बल १२ तासांनंतर मध्यरात्री १२ च्या सुमारास शहरातील सर्वच विसर्जनस्थळांवरील मिरवणुका समाप्त झाल्या. रात्री नऊनंतर तर पावसाने चांगलाच जोर धरला. मात्र गणेशभक्तांचा उत्साह तिळमात्रही कमी झाला नाही. शहरातील मुख्य मिरवणूक संस्थान गणपती राजाबाजार येथून सुरू होऊन गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी औरंगपुरामार्गे जिल्हा परिषद मैदानावर विसर्जित झाली. टीव्ही सेंटर, हर्सूल, मुकुंदवाडी, चिकलठाणा, गजानन महाराज मंदिर चौक, सातारा, वाळूज या भागातही उत्साहात विसर्जन मिरवणुका निघाल्या. भटिंडा, सापुताऱ्यातील पथक : काहीमंडळांनी याही वेळी वेगळेपण जपले. नवसार्वजनिक गणेश मंडळाने पंजाबमधील भटिंडा येथील बँड पथक आणि सापुताऱ्याच्या डोंगरातील आदिवासींचे पथक बोलावले. हे कलावंत विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. अनेक गणेश मंडळांनी चाळीसगावातील बँड पथके आणली. गणेशभक्तांनी ऑलिम्पिकमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचे यश हेल्मेट सुरक्षा, पोलिसांवरील हल्ले, महिला सुरक्षा, जलसंवर्धन या विषयांवर सादर केले. नारळीबागचा राजा, पावन गणेश मंडळ, नादब्रह्म, पतीत पावन ढोल पथक, विघ्नहर्ता, धर्मसंग्राम, हरहर महादेव, सावता गणेश मंडळ, बाल कन्हैया आदी मंडळांनी आकर्षक रोषणाईसह मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
चोखबंदोबस्तात निर्विघ्न पार पडली मिरवणूक : मराठवाड्यातइसिसच्या हालचाली पाहता विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी कडेकोट बंदोबस्त होता. पोलिस आयुक्तालय आणि गणेश महासंघाकडून मिरवणुकीत सहभागी रथ पथकांचे परीक्षण करण्यात आले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, रवी टाकसाळ, मंदार जोशी, विनोद काकडे, पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, छायाचित्रकार राजू शेख, अॅड. अंजली कुलकर्णी, समाजसेविका मृणालिनी फुलगीरकर यांनी काम पाहिले.
महिला बालकांचा जल्लोष
‘गणपतीबाप्पा मोरया’च्या घोषणांनी बच्चे कंपनीने गुरुवारी आसमंत दणाणून टाकले. महिलांचा अभूतपूर्व उत्साह लक्ष वेधणारा होता. सलीम अली सरोवराजवळील विहिरीवर सोसायट्या, कॉलन्यांतील श्री मूर्तींना निरोप देण्यात आला. बजरंग चौकात प्रत्येक पथकाचे स्वागत करण्यात आले.

चंद्रकांत खैरेंनी खाल्ली तनवाणींची पुरीभाजी
राजकारणात आरोप-प्रत्यारोप करणारे नेते विसर्जन मिरवणुकीत एकत्र दिसले. किशनचंद तनवाणी यांच्यामार्फत दिलेल्या पुरीभाजी प्रसादाचा खैरेंनी आस्वाद घेतला. अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट एकत्र दिसले.

विघ्नहर्त्याने विघ्न हरले
मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेल्या दुष्काळातून सुटका कर, अशी प्रार्थना गणेशभक्तांनी बाप्पाकडे केली होती. विघ्नहर्त्याने जणू भक्तांची प्रार्थना ऐकली आणि जाता जाता वरुणाला बोलावले. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, जालना, औरंगाबादसह सर्व जिल्ह्यांत महिनाभराच्या विश्रांतीनंतर जलधारा बरसल्या.

हर्सूल येथे कृत्रिम तलावात विसर्जन
यावर्षी हर्सूल तलावात श्रींच्या मूर्तींचे विसर्जनास प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली होती. तलावालगतच्या स्मृती उद्यानात तयार कृत्रिम तलावात २०० सार्वजनिक मंडळे आणि हजारो घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. महापौर त्र्यंबक तुपे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, निरीक्षक वसीम हश्मीसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या तलावाची पाहणी केली.

पर्यावरणपूरक गणेशांना घरीच निरोप पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना घरीच निरोप देण्यात आला. यंदा शहरातील ६० टक्के घरांमध्ये शाडू मातीचे गणराय विराजमान झाले होते. घरात विसर्जित मूर्ती पूर्णपणे विलीन होईपर्यंतची प्रक्रिया अनेकांनी मोबाइल कॅमेऱ्यांत टिपली.
छावणीत गुलाबपुष्पे उधळत निरोप
छावणीत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. गुलाबपुष्पे उधळत ढोल ताशाच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. छावणी गणेश महासंघांंचे अध्यक्ष िकशोर कच्छवाह, प्रमुख मार्गदर्शक अशोक सायन्ना यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पंधरा मोठे तर पंधरा छोटे गणेश मंडळ मिरवणुकीचे आकर्षण होते. अनिरुध्द गणेश मंडळाच्या ११० तरुणांच्या ढोल पथकाने सर्व भक्तांचे लक्ष वेधले. शिस्तबध्द पध्दतीने कला सादर करून या पथकाने सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले. रात्री दहाला होली क्रॉस इंग्लिश स्कूलजवळील विहिरीत गणरायाचे विसर्जन झाले. छावणीत गुलाबपुष्पे उधळत निरोप
बातम्या आणखी आहेत...