आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाच्या लिलावातून करणार दुष्काळग्रस्तांना मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कलेलाजिद्दीची जोड असल्यावर कोणतेही काम अवघड होत नाही. तांदळावर लिहिण्याच्या कलेमुळे गजेंद्र वाढोणकर या ३४ वर्षीय कलाकाराने औरंगाबाद ते ऑस्ट्रेलियापर्यंतचा प्रवास केला. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या चित्रावर तांदळाने ओबामांची बायोग्राफी लिहिली, तर सुवर्णमंदिरात सहा महिने राहून तांदळावर मंदिराचा इतिहास लिहून काढला. यासह विविध कामगिरीबद्दल त्यांना तीन वेळा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. आता २४ दिवसांत त्यांनी तांदळावर प्रथमच अष्टविनायक साकारले आहेत. प्रायोजकांच्या मदतीने त्याचा लिलाव करणार असून ती रक्कम दुष्काळग्रस्तांसह अनाथांना मदत म्हणून देणार आहेत.
हडको एन -९ येथील रेणुका मंदिरामागे राहणाऱ्या गजेंद्र यांचे शिक्षण कमी असूनही तांदळावर लिहिण्याच्या कलेमुळे त्यांनी थेट ऑस्ट्रेलियापर्यंत मजल मारली. तेथे राहणाऱ्या भारतीयांसाठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम ते करत आहेत. तेथे राहूनच त्यांनी तांदळाच्या दोन लाख दाण्यांवर शिर्डीच्या साईबाबांचे चरित्र कोरले. ते चरित्र लंडनच्या साईभक्ताने २१ कोटी रुपयांना मागितले. मात्र, ती ऑफर नाकारून त्यांनी ते चरित्र शिर्डीतील साईचरणी अर्पण केले. शिखांचा ग्रंथ सुखमणी साहिब त्यांनी गुरुमुखी भाषेत तांदळावर लिहिला. त्यामुळे त्यांना अमृतसरच्या सुवर्णमंदिरात बोलावून तांदळाच्या दाण्यावर मंदिराचा इतिहास लिहिण्याची संधी मिळाली. २०१० मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांचे चित्र तांदळावर काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्याचा तीन वेळा गौरव केला.

गजेंद्र ऑस्ट्रेलियातून मलेशियात स्थलांतरित झाले आहेत. साईचरित्र अर्पण करण्यासाठी मार्चमध्ये औरंगाबादेत आले होते. त्यानंतर ते शहरातच आहेत. त्यांनी फावल्या वेळेत तांदळावर अष्टविनायक साकारले आहे. प्रत्येक दाण्यावर त्यांनी गणपतीची नावे, अथर्वशीर्ष आणि अष्टविनायक महिमा लिहिला आहे. ही विलोभनीय कला त्यांनी फ्रेमबंद करून त्याला एलईडी लावली आहे. गजेंद्र यांची कलाकृती पाहण्यासाठी शहरातील भाविक गर्दी करत आहेत. या चित्रांच्या लिलावातून येणारी रक्कम ते दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर ते मेट्रो सिटी परदेशात प्रदर्शन करून मिळणारी सर्व रक्कम दुष्काळग्रस्त आणि अनाथांसाठी देणार आहेत.

गजेंद्र यांना त्यांच्या गल्लीतही जास्त कुणी कलाकार म्हणून फारसे ओळखत नाही; परंतु ऑस्ट्रेलियासह २२ देशांत त्यांची ओळख आहे. गुगलने तर गजेंद्रच्या कलेवर फिदा होत चक्क एक नव्हे, तर ८७ पाने त्यांच्या कलेसाठी, व्हिडिओसह अर्पण केली आहेत. तांदळावर तयार केलेला अष्टविनायकदेखील गुगलवर पाहता येणार आहे.