आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी केले देशाचे रक्षण, आता पर्यावरण संरक्षण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कार्याला आपलाही हातभार लागावा या ध्येयाने प्रेरित सुरेशकुमार बद्रीनाथ संत्रे या 70 वर्षीय माजी सैनिकाने गेल्या तीन दशकांपासूनच ‘निसर्ग बचाव’चा नारा दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याची जाणीव झाल्यापासूनच त्यांनी मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. आधी देशरक्षणाचा वसा घेतलेल्या संत्रे यांनी सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर पर्यावरण संरक्षणाची कास धरली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी गणेश मंडळांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीही पीओपीच्या मूर्ती आकर्षक असल्याने शाडूच्या मातीच्या मूर्तीच्या तुलनेत या पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे गणेशभक्तांचा ओढा जास्तच असतो. शाडू मातीपासून तयार मूर्तींनाच गणेशोत्सवात स्थान देण्याचे अनेक जण आवाहन करताना दिसून येतात. मात्र, ही बाब कृतीत आणली जात नाही. मात्र, याला सुरेशकुमार बद्रीनाथ संत्रे, रा. सिडको महानगर-1 ग्रोथ सेंटर हे अपवाद आहेत.

पारंपरिक व्यवसायातून पर्यावरण संरक्षण
संत्रे हे भारतीय सैन्यदलातून 1979 मध्ये सेवानिवृत्त झाले.निवृत्तीनंतर काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शेवटी त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. घरी बसून त्यांनी गणेशमूर्ती, महालक्ष्मी, पोळ्यासाठी बैल, नवरात्रींकरिता देवींच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. पूर्वी ते शेतातील चिकणमातीचा उपयोग करीत होते.

आता मात्र, ते शाडूच्या मातीचाच मूर्तींसाठी वापर करतात. शाडू मातीपासून मूर्ती साकारण्यास अनुभव व मेहनत लागते. त्यामुळे कमी मेहनत व सहज उपलब्ध होणारे साचे यामुळे आज निसर्गास धोकादायक ठरणार्‍या‘पीओपी’चा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे लोकांनीच जागरूकता दाखवण्याची गरज असल्याचे संत्रे यांचे म्हणणे आहे.

विक्री घरातूनच
मागील 12 वर्षांपासून शाडू मातीच्या मूर्ती तयार क रून विक्र ी करीत असल्याचे संत्रे यांनी सांगितले. या गणेशमूर्ती घरबसल्या हातोहात विक्री होतात. बाजारभावापेक्षा कमी किमतीत मूर्ती मिळत असल्याने ग्राहक व भाविकांचा कायम ओढा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी घडवली जाते मूर्ती
पुण्याहून शाडूच्या मातीची खरेदी केली जाते. आवश्यक तेवढी माती भिजवून ती साच्यात टाकली जाते. साच्याच्या आकारानुसार तयार मूर्तीला नंतर आकार देणे व इतर किरकोळ कामे केली जातात. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी मूर्ती सुकल्यानंतर रंगरंगोटी केली जाते. एका मूर्तीसाठी 7 दिवस लागतात.

पीओपीतील मोठय़ा मूर्तींचे विसर्जन कसे करणार?
पर्यावरणास हानिकारक असणार्‍या‘पीओपी’ मूर्तींवर शासनाने बंदी घालावी. रासायनिक रंगांच्या वापरामुळे जलचर प्राण्यांचे जीवनही धोक्यात आले आहे. यंदा वाळूज परिसरात कमी पाऊस झाला आहे. जलसाठे कोरडे आहेत. त्यामुळे जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे अशक्य होणार आहे. त्यासाठी शासनानेच‘पीओपी’च्या मूर्तींवर कायम बंदी घालावी. तरच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा संत्रे यांनी व्यक्त केली.