आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताराकरांनी जलधारांच्या साक्षीने दिला गणरायाला निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी हा सातारा, देवळाईतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन झाले अन् विसर्जनाच्या दिवशीही धुवाधार पाऊस झाल्यामुळे अाबालवृद्ध सुखावले. याच कोसळत्या जलधारांच्या साक्षीने साताराकरांनी गुरुवारी गणरायाला निरोप दिला. सातारा गावातील विहिरीत दिवसभरात ११८४ मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. या विहिरीभाेवती रात्री बारापर्यंत चिंब भिजलेल्या गणेशभक्तांची दाटी झाली.
मनपा समावेशानंतर एकेका प्रश्नासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे रहिवासी चांगल्या पावसामुळे सुखावले होते. त्यामुळे बाप्पाचे आगमनही दणक्यात झाले. १० दिवस मनोभावे पूजाअर्चा करून “अशीच कृपादृष्टी राहू दे’ असे साकडे भाविकांनी बाप्पाला घातले. गुरुवारी बाप्पाला निरोप देतानाही भाविकांच्या मनात हीच भावना होती. मनपा प्रशासनाने तीन दिवस आधीच विसर्जनासाठी व्यवस्था केली. खड्डे बुजवण्यासह विहिरीची साफसफाई, मंडप टाकणे आदी कामे तातडीने करण्यात आली. विसर्जनादरम्यान रुद्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी निर्माल्य जमा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. सायंकाळी साडेपाचपासून विहिरीजवळ गणेशभक्तांची दाटी झाली. याच वेळी सुरू झालेल्या पावसामुळे भक्तांचा उत्साह दुणावला. पुढील वर्षभर जलसंकटाचा सामना करावा लागू नये, या आशेने भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
गुरुवारी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

प्रशासनाची साथ
पोलिसांसह मनपा कर्मचारी, ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत भक्तांना अडचणी येऊ नयेत याची काळजी घेत होते. वॉर्ड अधिकारी शैला डाके, वॉर्ड अभियंता पी. जी. पवार, मनपा कर्मचारी विठ्ठल देवकर, माजी उपसरपंच फेरोज पटेल, सोमनाथ शिराणे आदी उपस्थित होते. सर्वात शेवटी सातारा गावातील गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

बातम्या आणखी आहेत...