आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायी: कचरावेचणा-या महिला बनल्या उद्योजक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कच-याच्या माध्यमातून मोठा उद्योग उभारला जाऊ शकतो हे शहरातील सात कचरावेचक महिलांनी सिद्ध केले आहे. या व्यवसायात असणा-यांसमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. स्वतंत्र गाळा भाड्याने घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून त्या उद्योग चालवतात. दिवसाकाठी आता त्यांना प्रत्येकी ३०० ते ३५० रुपये मिळतात.

शहरात हजारो कचराकुंड्यावर काही महिला रिकामी पोती घेऊन कचरा वेचतात. हजारो टन कच-यातून महिला प्लास्टिक, पुठ्ठे, कागद, पेपर बॅग्ज, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या वेगळे करतात. मोठी पोती भरून हा कचरा त्या ठोक व्यापा-यांना विकतात. हा कचरा ५० ते ७० रुपये किलो दराने विकला जातो. या व्यवसायातील पुरुषांची मक्तेदारी महिलांनी मोडीत काढली.
उधारीची साखळी तोडली : सीआरटी टीमच्या सदस्या नताशा झरिन, गौरी मिराशी, सनवीर छाबडा व स्नेहा बक्षी यांना काम करताना कचरावेचक महिलांची कर्मकहाणीच लक्षात आली. दिवसभर राबून या महिलांना खूप कमी पैसे मिळतात. अडचणीच्या वेळी आणि घरातील लग्नकार्याला कचरावेचक महिला कच-याच्या ठोक व्यापा-याकडून पैसे उधार घेतात. दररोज कचरा देऊन या पैशांची परतफेड त्यांना करावी लागते. दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपये व्यापारी कर्जापोटी कापून घेतो. हे कर्ज अनेक महिला आयुष्यभर फेडतात. कारण ठोक व्यापारी कमी भावात कचरा घेत असतो. नाइलाज असल्याने या महिला कचरा वेचून उधारी फेडण्यात आपले आयुष्य खर्ची करतात. सीआरटी टीमने सिंधी कॉलनीत कचरा गोळा करणा-या आशाबाई डोके यांची भेट घेतली, त्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहनही दिले.

अडचणींवर मात
आशाबाई डोके, नंदा पाईकराव या इंदिरानगर भागात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून या महिला कचरा गोळा करायच्या. आपणच जर कच-याचे वर्गीकरण करून विकले तर असा विचार त्यांच्या मनात रुजला अन् नंदा यांनी पै-पै जमवलेले पैसे या उद्योगात टाकले. एक गाळा इंदिरानगरात तीन हजार रुपये भाड्याने घेतला. त्यांनी इतर महिलांना आपल्या गटात घेतले. यात शिळाबाई, तारामती, चंद्रकलाबाई, कविताबाई, रंजना यांची साथ मिळाली अन् उद्योग सुरू झाला. व्यापा-यांना कचरा विकून १५० ते २०० रुपये रोज मिळत होता. आता त्यांना ३०० ते ३५० रुपये
रोज मिळतात.

मैत्रिणीने दिली साथ
मी गेल्या अनेक वर्षांपासून कचरा वेचण्याचे काम करीत होते; पण स्वत: उद्योजक होण्याचा विचार कधी मनात आला नव्हता. नंदाबाई या माझा मैत्रिणीने साथ दिली अन् हा उद्योग सुरू केला.
आशाबाई डोके, कचरावेचक महिला.

भाव वाढवून मिळाला
आम्ही वजन काटा, तराजूसह तीन हजार रुपये दराने जागा कचरा साठवणीसाठी भाड्याने घेतली आहे. आम्हा महिलांवर अजूनही खूप कर्ज आहे. शहरातील लोकांनी आमच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी. नंदाबाई पाईकराव, कचरावेचक महिला.