आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहराचा ‘कचरा’, यंत्रणेत उणिवा, लोकांचा बेजबाबदारपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात राहणाऱ्या प्रत्येकालाच वेळेच्या आत नोकरी वा व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचायचे असते...कुणी ऑफिसला जाताना कचऱ्याची पिशवी घेऊन निघतो...चौकात गाडी नसल्याने उघड्यावरच फेकून पुढे जातो...कधी कचऱ्याची गाडी आलेली नसते, तेव्हा उघड्या जागेवर कचरा फेकून महिला घरी परततात... सकाळी १० वाजता दुकान उघडणारे व्यापारी गाडीची वाट पाहण्याऐवजी दुभाजकांमध्येच कचरा फेकतात... अशा एक ना अनेक कारणांनी शहराची अवस्था लाजिरवाणी होत आहे. डीबी स्टारने कचऱ्याच्या अव्यवस्थापनाची कारणे जाणून घेतली. तेव्हा याला जेवढी मनपा, तेवढेच शहरातील नागरिकही जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले.

दिसली जागा, टाकला कचरा
मनपाकडूनकचरा संकलन करणाऱ्या वाहनांसह मजुरांचेही अव्यवस्थापन सुरू आहे. गाड्यांची वेळ निश्चित राहत नाही. त्यामुळे नागरिकही मोकळ्या जागेवर कचरा फेकून मोकळे होतात. रस्त्यावरील दुभाजक, रस्त्याचे कोपरे, कॉलनीतील मोकळे प्लॉट अशा ठिकाणी कचऱ्यांचे ढीग लागलेले आढळतात. स्वच्छ जागी कचरा कुणीच टाकत नाही. ज्या ठिकाणी अगोदर कचरा टाकलेला असेल किंवा कचरा जाळलेला असेल, अशाच ठिकाणी पुन्हा महिला कचरा फेकतात.

कारमधून उतरताच फेकला जातो कचरा
काहीमुख्य चौकाच्या बाजुला स्कीप लोडर, हूक लोडर कचरा संकलनासाठी ठेवलेले असतात. चारचाकी वाहनातून जाणारी मंडळी घरातून कचऱ्याची पिशवी घेऊन निघतात. लोडरजवळ येताच कारमधून उतरण्याऐवजी आतूनच लोडरच्या दिशेने कचरा फेकतात. यातील किमान ७५ टक्के कचरा लोडरमध्ये पडण्याएेवजी आजूबाजूलाच पडतो. याशिवाय दुचाकीवरून जाणारेही अशाच पद्धतीने कचरा फेकून शहराची शोभा करतात.

व्यापारीही आघाडीवर
कचरागाड्या सकाळी वॉर्डांमध्ये फिरतात. दुकाने दहानंतर सुरू होतात. तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. अशा वेळी दुकान मालक झाडझूड करून जमलेला कचरा कोपऱ्याला किंवा दुभाजकांवर टाकतात. दुसऱ्या दिवशी कचरावेचक तो कचरा निवडून घेऊन जातात. रस्त्यावर कचरा फेकण्यात सामान्य नागरिक जसे आघाडीवर आहेत, तसेच व्यापारीही आहेत.

फोटो व्हॉट्सअॅप करा, अर्ध्या तासात कचरा हटेल
कचरा व्यवस्थापनाबाबत मनपाने व्हॉट्सअॅप तक्रार करण्याची सोय उपलब्ध केली आहे. ७५०७१३३३३१ या क्रमांकावर कचऱ्याचे फोटो, मेसेज पाठवू शकता. कचऱ्याशी निगडित ज्या काही समस्या असतील, त्या नागरिकांनी या क्रमांकावर कळवाव्यात. अर्ध्या तासात कचरा हटवला जाईल. जर या क्रमांकावरून प्रतिसाद मिळाला नाही तर खुद्द झनझन यांच्या ९८२३०३३३२२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करू शकता. तशी सोय त्यांनी केली आहे.

डीबी स्टार निष्कर्ष
सभु स्टॉप : सरस्वतीभुवन महाविद्यालयासमोरील डिव्हायडरमध्ये कचरा आढळला. तो आजूबाजूच्या व्यावसायिकांनी टाकलेला होता. व्यावसायिकांना विचारले, तेव्हा मनपाची कचरा संकलन करणारी गाडी नियमित येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या परिसरात कचरा टाकण्यासाठी लोडरही नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने अनेकदा व्यावसायिक डिव्हाडरवर कचरा फेकतात.
बातम्या आणखी आहेत...