आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्डातच होऊ शकते कचर्‍याचे व्यवस्थापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोट्यवधींची कामे कंपन्यांना देण्यापेक्षा नागरिकांच्या सहभागातून घनकचरा व्यवस्थापन राबवले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात हे काम झाल्यास नारेगावात कचरा पाठवण्याची गरज पडणार नाही. मनपाने नागरिकांची समिती नेमून ही योजना राबवणे गरजेचे असल्याचे मत घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या सदस्या अलमित्रा पटेल यांनी सांगितले.
साॅलिड वेस्ट मॅनेजमेंट राउंड टेबलच्या वतीने औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आज जेएनईसीमधील आर्यभट्ट सभागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यात पटेल बोलत होत्या. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील िनयमावली केंद्राला तयार करायला लावण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या अलमित्रा पटेल यांनी औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापनाची दशा सांगतानाच उपायही सुचवले.
त्या म्हणाल्या की, घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या कंपन्यांनाच काम देण्याची गरज नाही. ते काम कमी पैशात आणि प्रभावीपणे आहे त्याच मनुष्यबळात करता येते. त्यासाठी नागरिकांना जागरूक करणे, कचरा वेचकांना पाठबळ देणे आणि कचरा उचलण्याच्या व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करणे एवढेच काम करावे लागणार आहे. सिंधी काॅलनीतील प्रयोगामुळे ही योजना यशस्वी होऊ शकते हे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाने आदेश देऊनही औरंगाबादचा कचरा नारेगावात टाकला जातो. तीन मजली इमारतीएवढे कचऱ्याचे ढीग तेथे आहेत. आता हे थांबले पािहजे. प्रत्येक वॉर्डात कचऱ्याचे व्यवस्थापन व प्रक्रिया केल्यास हे शक्य आहे. ओला व सुका कचरा वेगळा काढल्यास कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे जाते व कचऱ्यावर प्रक्रिया करता येते. कचरा हा स्रोत म्हणून वापरता येतो. जवळपास ८० टक्के कचरा कामी येतो व २० टक्केच कचरा फेरनिर्मितीसाठी वापरता येतो. असे केल्यास नारेगावात कचरा टाकण्याची गरजच पडणार नाही. त्यासाठी रुग्णालये, अपार्टमेंट, मंगल कार्यालये, काॅलनीमध्ये कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. कर्नाटकातील कोलम शहरात कचरा डेपोच नाही. तेथे १०० टक्के कचरा व्यवस्थापन करण्यात यश आले. आहे त्याच यंत्रणेने हे काम करून दाखवले आहे.
याआधी बंगळुरूच्या संध्या नारायणन आणि मरीयम क्राफ्ट यांनी तेथे केलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची मािहती दिली. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही हे देशातील सगळीकडे पाहायला मिळते.
ओला आणि कोरडा कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे छोटे प्रकल्प बंगळुरूरच्या सर्व १९८ वॉर्डांत करण्यात आले आहेत. त्यासाठी मोठे प्रकल्पच आणले पािहजेत असे नाही. त्याआधी सिंधी काॅलनीतील घनकचरा व्यवस्थापनाबाबत सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मनपाचे कार्यकारी अिभयंता सिकंदर अली, नगरसेवक राजू िशंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नताशा झरीन, रोिहत दाशरथी, गौरी मिराशी यांनी केले.
काय करता येईल औरंगाबादेत ?
घरोघरचा कचरा ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात यावे.
ओला कचरा वापरून त्यापासून खतनिर्मिती, ऊर्जानिर्मिती करता येते.
कचरा वेचकांच्या माध्यमातून सुका कचरा खास करून भंगार आणि प्लास्टिकची विल्हेवाट लावता येईल.
कचरा गोळा करणे, वर्गीकरण आणि प्रक्रिया यात कचरावेचक व मनपाचे कर्मचारी यांचा सहभाग वाढवणे.
नागरिकांमध्ये जनजागृती करून डेपोत कचरा टाकण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन वॉर्डावॉर्डांत शक्य आहे.
फक्त एक नगरसेवक
घनकचरा व्यवस्थापन हा महापािलकेशी संबंधित विषय असल्याने संयोजकांनी मनपा आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे, महापौर कला ओझा यांच्यासह नगरसेवकांनाही या कार्यशाळेसाठी नमिंत्रित केले होते. एलईडी व कत्तलखान्याच्या टेंडरचे काम असल्याने आयुक्त येऊ शकले नाहीत, असे संयोजकांनी सांगितले. महापौर कला ओझाही आल्या नाहीत आणि उरलेल्या ९८ नगरसेवकांपैकी फक्त एकमेव राजू शिंदे तेवढे हजर होते.
कचरावेचक घटक महत्त्वाचा
पुण्याच्या स्वच्छ या संस्थेच्या मंगल पगारे म्हणाल्या की, प्रत्येक घरातून कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि नंतर त्यावर प्रक्रिया करणे यात कचरावेचक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना आणि महापािलकेला सोबत घेऊन आम्ही आतापर्यंत चार लाख घरांचे घनकचरा व्यवस्थापन करू शकलो आहोत. अजून खूप काम बाकी आहे. औरंगाबादेत कचरा वेचकांना एकत्र करण्याचे काम सुरू झाले आहे. येथेही पुण्यासारखे काम करता येईल.