आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा उचलणार; विल्हेवाटीचे काय ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-साडेचार लाख लोकसंख्येच्या नगर शहरात दररोज सुमारे 120 टन कचरा जमा होतो. त्यापैकी 70 ते 80 टन कचर्‍याचे दररोज संकलन करून तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. उर्वरित कचर्‍याचे मात्र शहरातील विविध भागात ढीग लागले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर जगताप यांनी सोमवारपासून दुपारच्या सत्रातही शहराची स्वच्छता करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतला. उपक्रम स्तुत्य असला, तरी शहरातून उचललेल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्न जैसे थे आहे.
मागील काही वर्षांपासून शहरातील कचरा कोणतीही प्रक्रिया न करता तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. उर्वरित प्लास्टिकसारखा अविघटनशील कचरा परिसरात पसरल्याने सुमारे तीनशे एकर शेतजमीन नापीक झाली आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रशासनाने अनेकदा निविदा मागवल्या, ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवल्याने डेपोत कचर्‍याचा डोंगर निर्माण झाला. अनेक वर्षांपासून हा कचरा एकाच जागेवर असल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे 15 एकर जागेवर पसरलेला कचरा 5 एकर जागेवर डंप (ढीग) करण्याचा ठेका पुणे येथील ‘पार्श्व एन्टरप्राइजेस’ कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीने पंधरा दिवसांपासून काम सुरू केले आहे. सर्व कचरा डंप करून त्यावर औषधांची फवारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील प्रदूषण कमी होणार असले, तरी कचरा प्रक्रिया प्रकल्प अजूनही रखडलेलाच आहे. त्यामुळे शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न कायम राहणार आहे.
महापौर जगताप यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य देत दुपारच्या सत्रातही शहराची स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी शहरात केवळ सकाळच्या सत्रात स्वच्छता करण्यात येत होती. आता सकाळ व दुपार या दोन सत्रांत स्वच्छता होणार आहे. परंतु शहराचे वाढते विस्तारीकरण, अपुरे कर्मचारी व तोकडी यंत्रणा, यामुळे महापालिकेचा हा उपक्रम कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे. पुरेशा कचराकुंड्या व घंटागाड्या नसल्याने नागरिकांना जागा मिळेल तेथे कचरा टाकावा लागतो. त्यामुळे मोकळे भूखंड, रस्ते, संरक्षण भिंती अशा ठिकाणी कचर्‍यांचे ढीग लागले आहेत. स्वच्छता उपक्रमांतर्गत हा कचरा उचलण्यात आला, तरी त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची गरज आहे.