आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणीच्या पायथ्याशी १२ एकरांत वन उद्यान, दिवाळीपूर्वी खुले होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या वेरूळनगरीमध्ये वेरूळ लेणींच्या पायथ्याशी पाच हेक्टरवर भव्य महादेव वन उद्यान उभारण्यात येत असून वन विभागाच्या वतीने प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवर श्रावणात घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आले असता ग्रामस्थ व पर्यटकांची मागणी लक्षात घेता वन उद्यानाची घोषणा केली होती.

घृष्णेश्वर महादेव मंदिर, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, श्री संत जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठ, लक्षविनायक गणपती मंदिर, मालोजीराजे भोसले स्मारकासह अनेक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळांमुळे वेरूळनगरीस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वेरूळनगरीतील धार्मिक स्थळांचे दर्शन घेतल्यास काशी क्षेत्रापेक्षाही गहूभर पुण्य जादाच मिळते, अशी आख्यायिका आहे. येथील पर्यटनस्थळे पाहता या नगरीमध्ये दरडोई हजारो पर्यटक, भाविक हजेरी लावत असतात; परंतु या नगरीमध्ये बालगोपालांना बागडण्यासाठी, वृद्धाना विश्रांतीसाठी व पर्यटकांना फिरण्याकरिता सुसज्ज उद्यान असावे, ही मागणी होती.

श्रावण मासामध्ये सहकुटुंब घृष्णेश्वराच्या दर्शनाकरिता आलेले राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील परिस्थिती व ग्रामस्थ, पर्यटक, भाविकांची मागणी लक्षात घेत घृष्णेश्वराच्या सर्वांगीण विकासासह मूलभूत गरजा पुरविण्याकरिता दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले होते. याच वेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत वेरूळ परिसरात महादेव वन उभारण्यात यावे तसेच याकरिता तातडीने जागा पाहणी करावी, असे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने वन विभाग अधिकाऱ्यांनी लेणींच्या पायथ्याशी महामार्गालगत असलेली एमटीडीसीच्या ताब्यातील गट नं. ३७ क्षेत्रामधील ५ हेक्टर जागा निश्चित करून कामास सुरुवात केली. लवकरच या ठिकाणी चैनलिंक कंपाउंड, नैसर्गिक पाऊलवाटे करण्यात येणार आहे. यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस प्रत्यक्ष वृक्षलागवडीस सुरुवात होणार आहे. यात धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षांना प्राधान्य दिले जाणार आहे.
हे वन उद्यान दिवाळीपूर्वीच पर्यटक, भाविकांच्या सेवेत खुले होईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. गवंडर यांनी दिली.

धबधब्याचा उपयोग
वन उद्यान ज्या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्या जागेमधूनच लेणी क्र. १० पासून पडणाऱ्या धबधब्याचे पाणी पावसाळ्यात वाहणार असल्याने याचा सदुपयोग वन उद्यानातही करता येऊ शकतो. कारण हे पाणी मध्यम बंधारा करून अडवले, तर या वन उद्यानात छोटेखानी बोटिंग किंवा रंगीत कारंजेही उभारणे शक्य होईल.

वन उद्यान ठरणार आकर्षण
वन विभागातर्फे उभारण्यात येत असलेले महादेव वन उद्यान हे भविष्यात पर्यटनाचा आकर्षण केंद्रबिंदू ठरणार आहे. कारण हे वन उद्यान लेणींच्या पायथ्याबरोबरच लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असून एका बाजूस सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, तर दुसऱ्या बाजूस एमटीडीसीचे वेरूळ पर्यटक (अभ्यागत) केंद्र आहे. घृष्णेश्वर मंदिर अवघ्या काही मिनिटांवर आहे.