आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिळून सारे करू बदल: बागांना लोकसहभागाची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ब-याचदा नगरसेवकांच्या अर्थपूर्ण मागणीमुळे उद्यान विकसित करण्यासाठी महापालिकेडकून तरतूद केली जाते. हिरवळ लावली जाते. खेळणी खरेदी होते. वर्षभरात उद्यानाचे रूपांतर बकाल भूखंडात होते. नगरसेवक त्याची जबाबदारी स्वीकारत नाहीत. देखभालीसाठी कर्मचारी नाहीत, असे सांगून उद्यान विभाग मोकळा होतो. अशाही परिस्थितीत शहरातील काही भागात मात्र तिथल्याच नागरिकांनी नगरसेवकांच्या मदतीने बदल घडवला आहे. त्यामुळे त्या भागातली उद्याने हिरवीगार आणि आल्हाददायक आहेत. तसाच बदल शहराच्या इतर भागांतही होऊ शकतो. त्यासाठी आवश्यकता आहे सुजाण नागरिकांच्या आणि काही दात्यांच्या पुढाकाराची.

अशी तयार होतात उद्याने
कोणतेही रेखांकन मंजूर करताना त्यातील दहा टक्के जागा क्रीडांगण, उद्यानासाठी आरक्षित असते. जुन्या रेखांकनात जी खुली जागा उपलब्ध आहे, त्यावर उद्यान तयार करावे, असा प्रस्ताव नगरसेवक सर्वसाधारण सभेत सादर करतात. त्याला मंजुरी दिल्यावर उद्यान विभागाकडून त्याची तपासणी होते. अर्थसंकल्पात तशी तरतूद होऊन उद्यान तयार केले जाते. मात्र, त्याच्या देखभालीसाठी मनुष्यबळ आहे की नाही, याची स्पष्ट माहिती प्रस्तावात नसते. परिसरातील नागरिक निगा राखतील, असे नगरसेवकाचे म्हणणे असते. त्यावर प्रस्ताव मान्य केला जातो.

प्रक्रियेची गरज नाही
उद्यान दत्तक घेण्याऐवजी ते नियमित स्वच्छ, सुंदर करणारा गट तुमच्या कॉलनीत, वसाहतीत असेल तर त्यासाठी फार मोठी प्रक्रिया करण्याची गरज नाही. नुकतेच सेवानिवृत्त झालेले, ज्येष्ठ नागरिक त्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. नगरसेवकाच्या सहमतीने उद्यानाचा कायापालट करण्याचे काम तुम्ही तत्काळ सुरू करू शकता. त्यासाठी प्रस्ताव करण्याची गरज नाही.

कवितेच्या बागेत हिरवळ
ज्योतीनगरातील कवितांची बाग केवळ ज्योतीनगरच नव्हे तर संपूर्ण शहरातील आकर्षणाचे केंद्र आहे. सात-आठ वर्षांपूर्वी या उद्यानाचे चित्र बदलले. येथे ज्ञानेश्वरांपासून, कुसुमाग्रजापर्यंतच्या कवींची महती नव्या पिढीला कळते. येथील हिरवळ म्हणजे जणू काही गालिचाच आहे. एवढेच नव्हे, मार्निंग वॉकला येणा-या नागरिकांना जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा म्हणून तुळशीची सहाशे रोपटी लावलेली आहेत. मनपा कर्मचारी अत्यंत आत्मीयतेने उद्यानाची देखभाल करतातच. शिवाय येथेही ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांचे योगदान आहे. प्रत्येक झाडाविषयी आत्मीयता असणा-या सुजाण, सुज्ञ नागरिकांचा वावर असल्याने उद्यान सुरक्षित आहे.

मोहात पाडणारे केटली गार्डन
सिडको एन-४ भागातील केटली गार्डनची पाच वर्षांपूर्वी दुरवस्था होती. ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक प्रमोद राठोड यांनी त्याचे रूप बदलले. हिरवळ, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बाके लावण्यात आली. चौकीदार नेमण्यात आला. सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ व देखरेख असल्यामुळे या उद्यानाचे चित्र बदलले आहे. वृक्षारोपण व इतर सुविधांसाठी जगदीश गायकवाड, एस. पी. खन्ना पाठपुरावा करत असतात.

डॉ. मुखर्जी उद्यानाचा कायापालट
ज्येष्ठ नागरिकांसोबत काही तरुणही पुढे आल्याने सिडको एन-१ भागातील भक्ती गणेश मंदिरालगतच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाचा कायापालट झाला. पंधरा वर्षांपूर्वी येथे ६५ आंब्याची झाडे व पडीक जमीन होती. हिरवळीचा मागमूस नव्हता. गणेश मंदिरात नित्यनेमाने दर्शनासाठी येणा-या काही ज्येष्ठ भाविकांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी मनपाकडे पाठपुरावा सुरू केला. एवढेच नव्हे तर उभारणीपासून देखभालीपर्यंत सक्रिय सहभाग घेतला. झोके, घसरगुंडीसोबत विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. २५० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार केला. सकाळी, सायंकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले मोठ्या संख्येने येत असल्याने समाजकंटकांची उद्यान विद्रूप करण्याची हिंमत होत नाही.
पुढे वाचा