आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानोरांच्या शिवारात ‘गारपीट’चे प्रकाशन, भारत देवगावकरांचे दुसरे पुस्तक प्रकाशित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘पाणउतारा’कार भारत देवगावकर लिखित ‘गारपीट’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने त्यांच्याच पळसखेडा शिवारात झाले. या वेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

फेब्रुवारी ते मार्चदरम्यान झालेला अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे संपूर्ण वाताहत झाल्याचे एक वास्तव चित्रण देवगावकर यांनी या कवितासंग्रहात केले आहे. गारपिटीइतके अंगावर येणारे, भयभीत करणारे फार कधी नव्हते. मराठवाडा-खेडी-समाज विशेषत: दुर्बल समाज डोळ्यांदेखत या महिना-दोन महिन्यांच्या राक्षसी आक्रमणाने ओस केला. पत्रकारितेत असल्याने आणि या दु:खाशी नाते असल्याने त्यांना हे क्रमश: इतिहासाच्या साक्षीने नावानिशी लिहावे वाटले. ही दीर्घकविता त्यांच्या अंत:करणाची एक प्रचिती आहे. तराजूच्या काट्याने या कवितेचे मूल्य ठरवायचे नाही. या संकटातल्या विस्तीर्ण जीवनाचे चित्र मोकळे करणे हे त्यांचे आत्मिक समाधान आहे, असे ना. धों. महानोर यांनी या वेळी सांगितले.

गारपिटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. एवढा दाहकतेचा हा प्रसंग असतानाही याचे कुणालाच काही वाटले नाही. इतकेच नाही तर ही नैसर्गिक आपत्ती आहे म्हणून मानायलाही कुणीच लवकर तयार झाले नाही.

या अस्वस्थतेत गारपीट ही दीर्घ कविता साकारली, असे मनोगत कवी भारत देवगावकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आयडिया प्रकाशनचे के. टी. उपदेशे यांनी आभार मानले.
ते म्हणाले की, जगाचा पोशिंदा शेतकरी. या शेतक-यावर बेतलेला अवकाळी पाऊस अन् गारपीट या अस्मानी-सुलतानी संकट-गंडांतराची करुण कहाणी ही एक शोकांतिकाच आहे. ‘गारपीट’ दीर्घकवितासंग्रहाचे प्रकाशन कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते त्यांच्याच शिवारात एका अनोख्या पद्धतीने झाले, हे काय कमी आहे? अशा या अनोख्या पद्धतीचे भाग्य ‘गारपीट’ कवितासंग्रहाला लाभले आहे.