आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - सिडकोतील गरवारे स्टेडियमचा वापर लग्नसमारंभांसाठी करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी सोमवारी दिला.
गरवारे स्टेडियमचा गैरवापर थांबवण्यासाठी बसवराज जिबकाटे, संजय महामुनी, निशांत जैस्वाल, शेख समीर शेख पाशा यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याच्या सुनावणीदरम्यान 17 जानेवारीपर्यंत स्टेडियमच्या मुख्य क्रीडांगणाचा वापर खेळाशिवाय इतर कुठल्याच उपक्रमासाठी करू नये, असे आदेश देण्यात आले. धार्मिक कार्यक्रम, व्यावसायिक प्रदर्शने आणि लग्नसमारंभ यामुळे गरवारे स्टेडियमचे मोठे नुकसान होत आहे. स्टेडियम भाड्याने देण्याचा ठराव मनपाने घेतल्यामुळे क्रिकेटसाठी याचा वापर करता येत नाही. पिचला तडे जाऊन मैदानाच्या दुरुस्तीला एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे क्रिकेटपटूंसह इतर खेळाडूंना सरावासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. एप्रिल 2013 मध्ये एका लग्नासाठी मैदान भाड्याने दिल्यामुळे त्याची दुरवस्था झाली होती. त्यासंबंधी याचिकाकर्त्यांनी मनपा आयुक्तांकडे 25 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता.
मैदानाचा मूळ उद्देश क्रीडांगण असून त्याचा वापर त्यासाठीच केला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर मैदान भाड्याने देणे सुरू असल्याने अॅड. महेश भारस्वाडकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली. 27 ऑक्टोबरला आमदार एम. एम. शेख यांच्या मुलीच्या विवाहासाठी मैदान देण्यात आले होते. शेख यांनी तातडीने याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करून स्टेडियमचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ, अशी हमी दिली होती. मनपाचे उपायुक्त रवींद्र निकम यांनी खंडपीठात शपथपत्र दाखल केले. मनपातर्फे अॅड. संजय पगारे यांनी बाजू मांडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.