आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्ड आवश्यकच; ऑक्टोबरपासून ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गॅस सिलिंडरवरील सबसिडीची रक्कम ऑक्टोबरपासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे शहरातील साडेतीन लाख ग्राहकांना आधार कार्ड संलग्न बँक खाते उघडावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांना अनुदानाची रक्कम मिळणार नाही. संबंधित गॅस कंपन्यांनी आपल्या वितरकांना ग्राहकांचे आधार, बँक खाते क्रमांक नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शासनाच्या विविध योजनांची रक्कम आता थेट लाभार्थींच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार रेशन दुकानात ही पद्धत सुरू झाली आहे. आता सिलिंडर सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. 80 टक्के आधार नोंदणी झालेल्या देशातील 52 शहरात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सध्या राबविण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून औरंगाबाद शहरात ही योजना सुरू होणार असल्याचे गॅस कंपन्यांकडून सूतोवाच करण्यात येत आहे. त्यापूर्वी हिंदुस्थान, भारत आणि इंडेन या तीनही गॅस वितरण कंपन्यांकडून त्यांच्या वितरकांना ग्राहकांचे आधार व बँक खाते नंबर त्यांच्या गॅस कार्डशी जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व एजन्सीकडून ग्राहकांना सूचना देण्यात येत असल्या तरी, तिन्ही कंपन्यांच्या केवळ 20 टक्के ग्राहकांनीच आतापर्यंत आधार कार्ड आणि बँकेचे खाते क्रमांक एजन्सीला दिले आहेत. तीन महिन्यांत ग्राहकांना बँकेत खाते उघडून त्याला आधार नंबरची जोड देणे आवश्यक आहे. ऐनवेळी होणारी धावपळ थांबविण्यासाठी कंपन्यांनी ग्राहकांना व एजन्सीला सूचना दिल्या आहेत.

भारत गॅसची नोंद आयव्हीआरएस प्रणालीतून
भारत गॅस कंपनीने देशभरासाठी 9420456789 हा आयव्हीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टिम) प्रत्युत्तर संवाद प्रणालीसाठी एकच नंबर दिला आहे. या नंबरवर कॉल केल्यास घरी बसूनच आधार नंबर, बँक खाते नंबर नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांचा नंबर एजन्सीवर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.

सूचना दिल्या आहेत
कंपनीच्या आदेशाप्रमाणे आधार कार्ड आणि बँकेचे खातेनंबर एजन्सीला देण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.
-दीपक व्यास, एजन्सी चालक

एक ऑक्टोबरपासून लागू
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ऑक्टोबरपासून शहरातील गॅस सिलिंडर ग्राहकांची सबसिडी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याला मुदतवाढही देण्यात येऊ शकते.
-मंगेश आस्वार, एजन्सी चालक

अंमलबजावणीची अद्याप माहिती नाही
प्राथमिक अंदाजानुसार शहरात ऑक्टोबर महिन्यापासून ग्राहकांच्या खात्यावर सबसिडीची रक्कम जमा होण्याची योजना सुरू होईल. याच्या अंमलबजावणीची स्पष्ट माहिती अद्यापपर्यंत देण्यात आली नाही.
-गोविंद आचरेकर, विभागीय विक्री अधिकारी, भारत पेट्रोलियम