आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधीची वाट पाहण्यापेक्षा आम्ही माइकचा ताबा घेऊ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एप्रिल महिन्यात निवडून आलेल्या ५७ नगरसेविकांसाठी मनपाची सभा महत्त्वाची होती. पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नावरून नागरिकांनी आम्हाला भंडावून सोडले आहे, असे त्यांना शनिवारी २० जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडायचे होते. मात्र, आमच्याच पक्षाची सत्ता असूनही आम्हाला पदाधिकाऱ्यांनी बोलण्याची संधीच दिली नाही, अशी तक्रार शिवसेना-भाजपच्या नगरसेविकांनी व्यक्त केली. बोलण्याची संधी मिळेल की नाही, याची वाट पाहण्यात अर्थच नाही. त्यापेक्षा माइकचा ताबा घेऊन समस्या मांडाव्या लागतील, असा धडा त्यांनी पहिल्या सभेत शिकला. दुसरीकडे एमआयएमच्या नगरसेविकांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आणि त्यावर इतर पक्षांच्या नगरसेवकांना बोलतेही केले.
एमआयएमच्या सविता वाघुले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वॉर्डात पाइपलाइन नसल्याकडे लक्ष वेधले, तर आणखी एका नगरसेविकेने प्रशासनाच्या चुकीमुळे जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जावी, याकडे लक्ष वेधले.
सत्ताधारी पक्षाच्या शीतल गादगे, स्वाती नागरे, सीमा खरात, सीमा चक्रनारायण, मीना गायके, ज्योती मोरे, सुरेखा सानप, आशा भालेराव, सुनीता आऊलवार यांनी आम्हाला म्हणणे मांडायची संधीच मिळाली नसल्याचे सांगितले. पाणी-कचरा हा महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, लोक घरी येऊन आम्हाला प्रश्न करतात, तक्रारी मांडतात. त्या प्रशासन, महापौरांपुढे ठेवून त्याची उत्तरे मिळवण्याचा आमचा विचार होता, असे त्या म्हणाल्या.
सानप म्हणाल्या, माझ्या वाॅर्डात रस्ते, पाणी अशा सर्व समस्या आहेत. पाण्याचे अक्षरश: डोह साचले आहेत, या पाण्यात आम्ही पोहायचे का, असा सवाल नागरिक करत आहेत. त्यांचा आवाज आम्हाला पोहोचवायचा होता. सभागृहात ५० टक्के महिलांना संधी मिळाली असली तरी बोलण्याची संधी काही मिळाली नाही. शीतल गादगे यांनी तर पुरुष नगरसेवकांनी आम्हाला बोलूच दिले नाही, असा सूर लावला. ज्योती अभंग, विजया बनकर, वैशाली जाधव, अनिता साळवे आणि विमल कांबळे या युती समर्थक नगरसेविकांनीही हीच खंत व्यक्त केली. अभंग म्हणाल्या, की यापुढे संधीची वाट पाहण्यापेक्षा आपणच माइकचा ताबा घेऊन बोलावे लागेल, असा धडा मिळाला.
अनेक गोष्टींचे निरीक्षण केले
पहिलीच सभा असल्याने आज आम्ही अनेक गोष्टींचे निरीक्षण केले अन् समजावून घेतल्या. पण, पुढच्या सभेत नक्कीच आम्ही सभा गाजवू. सभेमध्ये कुठले विषय बोलावेत, कोणते मुद्दे उपस्थित करावे, कसे करावेत याबद्दल पक्षाकडून कुठलेच मार्गदर्शन मिळाले नसल्याचेही सत्ताधारी पक्षांच्या नगरसेविकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...