आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैलास लेणीसाठी फेसबुकवर १६ ग्रुप, जर्मन पत्रकार क्रिस्टलचे तीन वर्षांपासून कैलासवर संशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वेरूळमधील कैलास लेणीच्या निर्मितीबाबत असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी ७६ वर्षीय जर्मन संशोधक- पत्रकार क्रिस्टल प्लित्झ वर्षांपासून झटत आहेत. आतापर्यंत सहा वेळेस वेरूळला भेट देऊन त्यांनी कैलास जाणण्याचा प्रयत्न केला. आता हा विषय पुढे नेण्यासाठी त्यांनी फेसबुकवर इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, लिपीशास्त्र, भूगोल अशा विविध शाखांतील जगभरातील तज्ज्ञांचे १६ अभ्यास गट तयार केले आहे. यात औरंगाबादेतील तज्ज्ञांचा समावेश आहे. कैलासविषयीचे संशोधन करून याविषयी नवीन माहिती जगासमोर आणण्याचे काम हे गट करणार आहेत.

वेरूळमधील १६ क्रमांकाची लेणी म्हणजेच कैलास लेणी- मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना. कैलासावर अनेक धार्मिक, माहितीपर, पर्यटनविषयक पुस्तके लिहिली गेली. पण या वास्तूच्या स्थापनेपासून तिच्या निर्मितीचा उद्देश, यासाठी वापरलेले तंत्रज्ञान, लेणीतून मिळणारा संदेश, यासारख्या अनेक प्रश्नांबाबत संशोधकांच्या मनात शंका अाहेत. जर्मन पर्यटक आणि संशोधक क्रिस्टल प्लित्झ त्यापैकीच एक. कैलास हे जगातील सर्वात मोठे ऊर्जा केंद्र असून येथे अलौकिक, अद््भुत शक्ती कार्यरत असल्याचा त्यांचा दावा आहे. या दाव्याच्या पडताळणीसाठी त्यांनी सहा वेळेस कैलासला भेट दिली. तज्ज्ञांच्या भेटी घेऊन कैलास जाणण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरात १०५ वर्षांची आजारी आई असल्यामुळे त्यांना परत वेरूळला येणे शक्य होत नाही. तरीही घरी बसून त्यांचे कैलासवरील संशोधन सुरूच आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी फेसबुकवर ‘सेव्ह कैलाश’ हे पेज सुरू केले. बघता बघता याचे २४४० सदस्य झाले. हे सर्वच पुरातत्त्वप्रेमी, अभ्यासक, संशोधक, ट्रॅव्हलर आहेत. क्रिस्टल दररोज कैलासची छायाचित्रे या पेजवर विश्लेषणासहित टाकतात. त्यावर ऑनलाइन चर्चा होते.

आता १६ अभ्यास गट : ऑनलाइन चर्चेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होतात. कैलासचे रहस्य उलगडण्यासाठी या तज्ज्ञांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा, ही कल्पना त्यांच्या मनात आली. कैलासचे रहस्य उलगडण्यासाठी १६ विविध मार्गांनी काम करण्यास वाव आहे. त्यानुसार त्यांनी अभ्यासाचे १६ विषय तयार केले. मग अगदी अधाशासारखे फेसबुक फ्रेंड्सलिस्टमधील एकेका सदस्याचे प्रोफाइल चेक केले. १६ विषयांनुसार त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञाला त्या गटात समाविष्ट केले. यातूनच मग १६ अभ्यास गट तयार झाले. यात पुरातत्त्वविद्, भूगर्भशास्त्रज्ञ, गणितज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भूरसायनशास्त्रज्ञ, मूर्तिकार, लिपीतज्ज्ञ, फोटोग्राफर, इतिहासतज्ज्ञ, भूजलतज्ज्ञ, विविध शाखांतील अभियंते, डॉक्टर, संशोधक आदींचा समावेश आहे. यात औरंगाबादचे वास्तुविशारद प्रदीप देशपांडे, दुलारी कुरेशी, एएसआयमधील तेजस गर्गे, स्नेहाली कुलकर्णी, संजय पाईकराव, वेरूळचे योगेश जोशी यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ आता कैलासासंबधी आपापली मते, निरीक्षणे, अभ्यास फेसबुकवर नोंदवतील. त्यावर अन्य सदस्य चर्चा करतील. शहरातील एका तरुण आर्किटेक्टनेही दोन वर्षांपूर्वी कैलास लेणीवरील फ्रेंड्स ऑफ कैलास हे फेसबुक पेज सुरू केले होते. याचेही ४४६ सदस्य आहेत. यावरही कैलासबाबत नवनवीन माहितीची देवाण-घेवाण होते.

कोण आहेत क्रिस्टल?
७६ वर्षांच्या क्रिस्टल प्लित्झ या मूळ जर्मन आहेत. बालपण, शिक्षण जर्मनीत झाले. तब्बल ४० वर्षांपासून त्यांचे थायलंडमध्ये वास्तव्य आहे. जर्मनीतील सर्वाधिक खपाचे फ्रंकफर्टर अल्गेमाइना झायटोन आणि डी वेल्ट या वृत्तपत्रांसाठी त्यांनी ३० वर्षे थायलंडमधून साऊथ ईस्ट एशिया करस्पाँडंट म्हणून काम केले आहे. तर १० वर्षे हंडल्स ब्लट या बिझनेस डेलीसाठी त्यांनी वार्तांकन केले आहे. या काळात त्यांनी व्हिएतनाम युद्धाचे रिपोर्टिंग करत आपल्या कामाचा ठसा उमटवला. निवृत्तीनंतर त्यांचे जगभरातील पर्यटनासोबत संशोधन सुरू आहे. संशोधनाची आवड आणि अध्यात्माशी असणारे नाते त्यांना वेरूळपर्यंत घेऊन आले.

आता उलगडेल कैलासचे रहस्य
एका वास्तूसाठी एका विचाराचे २४४० तज्ज्ञ एका व्यासपीठावर येणे ही कैलासच्या निर्मितीएवढीच चमत्कारिक बाब आहे. एका विचाराने भारावलेल्या या सदस्यांनाच आता त्यांच्या ज्ञानानुसार १६ गटांत विभागले आहे. यातून कैलासचे रहस्य उलगडेल, अशी अपेक्षा वाटते. मात्र, या गटात नसतील त्यांचेही स्वागत आहे. कैलासबाबत काही माहिती असल्यास शेअर करा. -क्रिस्टल प्लित्झ, संशोधक पत्रकार, थायलंड.
बातम्या आणखी आहेत...