आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याक नावाचा फायदा घेऊ नका, \'घर घर मोदी’ अभियानात मुस्लिम कार्यकर्त्याची धरली कॉलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मतदारांना भाजपशी जोडण्याकरिता निघालेल्या भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्येच जोरदार वादावादी झाली. एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हे प्रकरण जवाहरनगर पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर मिटले.
मोदींसाठी प्रत्येक घरातून किमान एक रुपया गोळा करावा आणि त्यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन करणारे अभियान 18 फेब्रुवारीपर्यंत राबवा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याची सुरुवात मंगळवारी (11 फेब्रुवारी) त्रिमूर्ती चौकात झाली. या भागातील दुकानदारांकडून रक्कम गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू असताना भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल हफिज यांनी गर्दीतील एका कार्यकर्त्याला लवकर लवकर पाय उचला. गप्पा मारू नका, असे म्हटले. मात्र, त्यांनी हा टोला आपल्यालाच लगावला असे म्हणत नगरसेवक अनिल मकरिये त्यांच्या अंगावर चालून गेले. कोणाला बोलतोस, असे म्हणत मकरियेंनी आवाज चढवला. हफिज यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे हफिज यांनीही आरडाओरड सुरू केली. मकरिये, हफिज यांनी एकमेकांची कॉलर धरली. शहराध्यक्ष भगवान घडामोडे, प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तो फोल ठरला.

अल्पसंख्याकांची गरज
भाजपला अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची गरज नाही तर आम्हाला कशाला सोबत घेतले, असा सवाल हफिज वारंवार करत होते, तर अल्पसंख्याक असल्याच्या नावाखाली उगाच फायदा घेऊ नका, असा इशारा मकरिये देत होते. अखेर हफिज जवाहरनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ अभियानातील सर्व पदाधिकारीही ठाण्यात गेले. तेथे सावे आणि घडामोडे यांच्यातही जोरदार चकमक झाली. घडामोडे हफिजला पाठीशी घालत असल्याचे सावे म्हणत होते, तर मकरियेंना आवर घालावा, असे घडामोडेंचे म्हणणे होते. हा सारा प्रकार पाहून पोलिस निरीक्षक हेमंत कदमही चकित झाले. पक्षातील वाद चव्हाट्यावर कशाला आणता, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा पदाधिकारी भानावर आले. तोपर्यंत हफिज यांचे समर्थक राहुल चौधरी ठाण्यात पोहोचले होते. त्यांनी मध्यस्थी केल्यावर प्रकरण निवळले.
पुढील स्लाइडमध्ये, घरोघरी प्रचाराऐवजी चौकात दुकानदारांकडून केला निधी गोळा

जेव्हा महिलेला विचारले कोण आहेत मोदी?