Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Gharkul Beneficiary Selected On House Of MLA Farande

आमदार फरांदेंच्या घरी ठरले घरकुल लाभार्थी; डाॅ. हेमलता पाटील यांचा अाराेप

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 09:43 AM IST

  • आमदार फरांदेंच्या घरी ठरले घरकुल लाभार्थी; डाॅ. हेमलता पाटील यांचा अाराेप
नाशिक-शिवाजीवाडी, भारतनगरभागातील घरकुल लाभार्थ्यांच्या यादी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या घरात तयार केल्याचा आरोप काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी अायुक्तांकडे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत स्थानिक नगरसेवकासह त्यांचे नातेवाइक आमदारांच्या कार्यकर्त्यांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. घरकुल वाटपाच्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे ही सर्वेक्षण करून निवडली जाणे गरजेचे अाहे. परंतु शिवाजीवाडी, भारतनगर येथील घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीत मात्र सगळे नियम डावलण्यात आले आहेत. शंभर फुटी रस्त्यामुळे विस्थापीत होणाऱ्या ३० लाभार्थ्यांना घरे देण्याऐवजी स्थानिक नगरसेवकांने दीडशे बोगस लाभार्थी तयार करून ती घरकुलांच्या यादीत घुसविल्याचा आरोप पश्चिम विभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे. या घरकुलांच्या यादीत लाभार्थी ठरलेल्या बोगस लाभार्थ्यांची यादीच पाटील यांनी आयुक्तांकडे सादर केली आहे. त्यात नगरसेवकांचे भाऊ, नातेवाईक, माजी नगरसेवक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्याचा समावेश करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे घरकुल लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन हे संबंधित झोपडपट्टी व विस्थापितांच्या वस्तीत करणे अपेक्षित असताना आमदार फरांदे यांच्या घरी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेच्या यंत्रणेचा चुकीचा वापर करण्यात आला असून यात पालिकेतील अधिकाऱ्यांनाही हाताशी धरण्यात अाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रारीद्वारे दिली आहे. तसेच निवडलेल्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याची मागणी त्यांनी केल्याने ही योजनाच आता वादात सापडली आहे.

राजकीय हेतूने अाराेप
कुठल्याही लाभार्थ्यांची नावे माझ्या घरात निश्चित केलेली नाही. लाभार्थी निश्चित करणे हे पूर्णत: प्रशासनाचे काम अाहे. राजकीय हेतूने प्रेरित हाेऊन माझ्यावर अाराेप करण्यात अाला अाहे. वास्तविक, घरकुल याेजनेचा फायदा गाेरगरिबांना व्हावा यासाठी मी विधिमंडळात मुद्दा उपस्थित केला हाेता. गेल्या नऊ वर्षांपासून ही याेजना राबविली जात असली तरीही तिचा फायदा अद्याप लाभार्थ्यांना झालेला नाही. उलट घरकुलांचे दारे, खिडक्या यांची चाेरी झालेली अनेक ठिकाणी दिसते. याेजनेचा फायदा तातडीने गाेरगरिबांना करून द्यावा अशी माझी मागणी अाहे.
- प्रा. देवयानी फरांदे, अामदार

Next Article

Recommended