आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghati Civil Hospital Issue Aurangabad Maharashtra

‘वजन’ ठेवा, तरच मिळेल एक्स-रे रिपोर्ट; घाटीतील सेवकाने मागितली चिरीमिरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मंगळवार (11 जून) दुपारी दीड-दोनची वेळ.. घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात नेहमीप्रमाणे वर्दळ. अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण आदी कार्यालयात बसलेले असताना अचानक एका नातेवाइकाने गट्टाणींच्या केबिनमध्ये प्रवेश करत घाटीच्या एका सेवकाला केबिनमध्ये आणले. आणि याच व्यक्तीने ‘वजन ठेवले नाहीतर एक्स-रेचा रिपोर्ट मिळणार नाही’ अशी मागणी केल्याची तक्रार केली.. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीसमक्ष घडलेल्या या प्रसंगाने सगळेच थबकले आणि अर्थातच वेगळ्या पद्धतीने सारवासारव झाली.

क्ष-किरण विभागात तंत्रज्ञ-कर्मचार्‍यांकडून रुग्ण व नातेवाइकांना होणार्‍या अरेरावीविषयी ‘दिव्य मराठी’ने काही दिवसांपूर्वीच सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. असेच प्रकार अजूनही प्रशासनाला अजिबात न जुमानता बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ‘दिव्य मराठी’चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अरेरावी करणार्‍या तंत्रज्ञ-कर्मचार्‍यांची चौकशी करण्यासाठी खास समितीही नेमण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण होण्याआधीच हा प्रकारही समोर आल्याने घाटीची ‘शिस्त’ चव्हाट्यावर आली आहे. कोणत्याही तपासणीसाठी ‘वजन’ मागणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे अजून एक जिवंत उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे.

काय झाला प्रकार?
एका रुग्णाची एमएलसी केस होती आणि त्याला एक्स-रे काढण्यासाठी सांगण्यात आले होते. एक्स-रे काढला आणि नातेवाइकाने रिपोर्टची मागणी केली. त्याचवेळी क्ष-किरण विभागातील सेवक अब्दुल रज्जाक यांनी ‘वजना’ची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकाने थेट अधीक्षक कार्यालय गाठले. अब्दुल रज्जाक यांना अधीक्षकांसमोर उभे केले आणि सर्वांसमक्ष तक्रार केली. त्यावेळी रज्जाक यांचा, असे काही घडलेच नसल्याचा आविर्भाव होता. प्रसंगावधान राखून वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी दोघांना हळूच अधीक्षकांच्या केबिनबाहेर काढले आणि प्रकरण संपवले. संबंधित नातेवाईक लेखी तक्रार न करताच घाईघाईने निघून गेल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.