आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी : दुर्गंधीचे फटके अन् नाक मुठीत आवळण्याची शिक्षा..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकार वर्षाकाठी सुमारे 20 लाख खर्च करते; परंतु या खर्चावर दुर्गंधीने मात केली असून रुग्ण-नातेवाईक आणि डॉक्टर-कर्मचार्‍यांना वर्षभर नाक मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. दुर्गंधी दूर करण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा मात्र एकमेकांवर दोष देण्यातच धन्यता मानत आहे. प्रत्येक आठवड्यात सर्व 30 वॉर्डांसाठी ‘सनीकॅन’च्या (जंतुनाशक) 8 ते 10 बाटल्या, अँसिडच्या 8 ते 10 बाटल्या, फिनाइलचे दोन-तीन डबे, 12 झाडू, 12 खराटे, हँडवॉश असे सगळे साहित्य दिले जाते. तरीही येथे समस्याच समस्या आहेत.

ओपीडीत घाणीचा कळस : ज्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे 1600 ते 2000 रुग्ण येतात, त्या ठिकाणचे शौचालय गेल्या काही वर्षांपासून बंदच आहे. एक शौचालय पूर्णपणे ब्लॉक आहे, तर दुसर्‍यात पाण्याची सोय नाही. सर्व वॉश बेसिन तुटले असून, फक्त लोखंडी गज उरले आहेत. इथे घाण आणि अस्वच्छतेची एवढी भीषण स्थिती आहे की कुठल्याही व्यक्तीची पाय ठेवण्याची हिंमत होऊ नये. कधी साफसफाई होत असेल, यावरही कुणाचा विश्वास बसणार नाही, अशी स्थिती आहे.


उंदीर-साप-घुशींचा हैदोस : वॉर्डावॉर्डांत आणि परिसरात सर्रास टाकल्या जाणार्‍या अन्नामुळे मोठय़ा संख्येने उंदीर येतात त्यांच्यामागे साप लागतात. दर आठवड्याला येथे सर्पमित्राला बोलवावे लागते. नेहमीच पडलेल्या खरकट्या अन्नामुळे घुशींनी घाटीला घर केले असून अख्खी इमारत पोखरली जात आहे. दुर्दैवाने, कुठेही अन्न फेकून देणार्‍यांवर कुठलीही कारवाई होत नाही आणि ‘पेस्ट कंट्रोल’च्या उपाययोजनाही होत नाहीत.


वॉर्डावॉर्डात अस्वच्छता
सजिर्कल बिल्डिंगमध्ये शौचालय ब्लॉक आहेत, तर अनेक ठिकाणी व्यवस्थित सफाई होत नाही. प्रत्येक मजल्यावरील बाल्कनीत, खिडकीत, जिन्यात, एवढेच काय जागा मिळेत तिथे फेकलेले अन्न दिसून येते. पान-तंबाखू-गुटख्याच्या पिचकार्‍यांनी वॉर्ड-कॉरिडॉर रंगले आहेत. कॉरिडॉरमधून फिरताना दोन्हीकडून फुटलेल्या पाइपमधून, चेंबरमधून जागोजागी ड्रेनेज वाहताना दिसते. कॉरिडॉरच्या गजाळ्या घाण झाल्या आहेत. लिफ्टच्या आजूबाजूला व सर्वच खिडक्यांमध्ये अस्वच्छतेची प्रतीके दिसतात. परिणामी बारा महिने 24 तास तीव्र दुर्गंधी असते. चारही ओटींमध्ये पुरेशा प्रमाणात फेमिगेशन व स्वच्छता होत नसल्याचेही समजते.


‘बांधकाम’चे सहकार्य नाही
घाटी रुग्णालयातील वॉर्डाच्या आतील स्वच्छतेची जबाबदारी तेथील इन्चार्ज सिस्टरची असते. बाह्यस्वच्छतेसाठी पूर्वी 40 कर्मचारी मिळत होते, आता केवळ 8-10 कर्मचारीच मिळतात. त्यातही कोणी गैरहजर असेल तर आमच्याकडील कर्मचारी द्यावे लागतात. तरीही प्राप्त परिस्थितीत चांगली स्वच्छता करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र बांधकाम विभागाचे सहकार्य मिळत नाही. ड्रेनेज ब्लॉकची अनेक ठिकाणी समस्या आहे. भास्कर टेकाळे, स्वच्छता निरीक्षक.


दोष बांधकाम विभागाचा
सजिर्कल बिल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी पाइप-चेंबरला लिकेजेस आहेत. बहुतेक ठिकाणी ड्रेनेज ब्लॉक आहेत. सर्व ड्रेनेज लाइन बदलण्यात आलेल्या नाहीत. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. प्रत्येक वॉर्डात कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या बकेट दिल्या आहेत; पण रुग्णांचे नातेवाईक दुसरीकडे कचरा-घाण टाकतात. कधी शौचालयात पट्टय़ा-बँडेज टाकतात. त्याच वेळी महापालिका वैद्यकीय घनकचरा रोज नेत नाही. नवीन आर्थिक वर्षात ‘पेस्ट कंट्रोल’चा प्रस्ताव मंजूर होण्याची आशा आहे. - डॉ. अविनाश मगरे, वैद्यकीय उपअधीक्षक.


घुशी चेंबर उखडून टाकतात
काही भागात ड्रेनेजलाइन बदलणे बाकी आहे. ते लवकरच होईल. मात्र खरकट्या अन्नामुळे सगळीकडे घुशी झाल्या असून, नवीन चेंबर केले तरी घुशी लगेचच उखडून टाकतात. त्यासाठी पेस्ट कंट्रोल आवश्यक आहे. अशोक जाधव, सहायक अभियंता, घाटी सेवा केंद्र.