आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghati Hospital Doctor Cut Practice Issue Aurangabad

‘कट प्रॅक्टिस’ने घाटी किडली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीच्याच काही डॉक्टरांनी घाटीचे वाटोळे केले आहे. या रुग्णालयास ‘कट प्रॅक्टिस’ची कीड लागली आहे. 80 टक्क्यांपेक्षा जास्त डॉक्टर-कर्मचार्‍यांचे हात ‘खासगी प्रॅक्टिस’मध्ये बरबटले आहेत. मोजक्याच तासांसाठी येणार्‍या डॉक्टरांचे तन-मन ‘खासगी’त गुंतल्याने कधी नव्हे इतके नैतिक अध:पतन बघायला मिळत आहे. वरिष्ठांच्या डोळ्यांदेखत हे प्रताप सुरू असताना त्याकडे सोयिस्कर डोळेझाक केली जात आहे.

शासकीय वैद्यकीय सेवा करणार्‍या डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करू नये म्हणून त्यांना वेतनाच्या 35 टक्के नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स (एनपीए) दिला जातो. मात्र हा भत्ता घेऊनही अनेक डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसद्वारे पैसे कमावण्याचा मोह अनावर झाला आहे. यात घाटीचे 80 टक्के डॉक्टर गुरफटले आहेत. ‘कट’चे बहुतेक सगळे प्रकार इथे सर्रास बघायला मिळतात. किमान तीन ते चार खासगी पॅथॉलॉजी चालक इथे येऊन स्वत: रुग्णांचे रक्त काढून नेतात. अनेकदा डॉक्टर स्वत: रुग्णांचे रक्त नमुने देतात. पुन्हा वॉर्डावॉर्डात रुग्णांपर्यंत रिपोर्ट पोहोचवण्याचा ‘अधिकार’ही त्यांनी मिळवला आहे. कुणाचीही भीडमुर्वत न बाळगता सरकारी रुग्णालयात खासगी धंदेवाइकांचा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. कुणाचे रक्त घ्यायचे आणि कोण आर्थिकदृष्ट्या ‘लायक’ आहे, हे खुद्द घाटीतील डॉक्टरच सांगत असल्याने लॅबचालकांना मोकळे रान मिळाले आहे. ठरल्यानुसारच सर्व प्रकारची ‘डीलिंग’ होते. घाटीत अनेक अत्यावश्यक औषधी मिळत नाही आणि मिळत असली तरी ‘मी सांगतो त्या दुकानातून आणि त्याच कंपनीची’ औषधी घेऊन येण्यासाठी सक्ती करणारेही तेच ते डॉक्टर आहेत. त्यामुळे ‘मागेल त्याला मागेल तिथे’ औषधी पोहोचवण्याचे कामही चार-पाच विक्रेत्यांचे नित्यनेमाने सुरू आहे.

प्लास्टर, शस्त्रक्रिया, उपचाराचे साहित्यही अनेकदा याच सक्तीच्या पद्धतीने झाल्याशिवाय उपचार होत नाहीत, अशी स्थिती सध्या इथे आहे. डॉक्टरांना अपेक्षित असलेल्या दुकानातून साहित्य आणले नाही, तर ते परत करण्यास सांगितले जाते. त्यांना हव्या असलेल्या दुकानात जाण्यास भाग पाडले जाते. भर ओपीडीच्या वेळेत एमआरना ‘एंटरटेन’ करणारे डॉक्टरही इथे सर्रास दिसतात. अर्थातच, घाटीत 10-20 टक्के चांगले-प्रामाणिक डॉक्टर-कर्मचारी आहेत आणि त्यांच्याच जिवावर घाटी अजूनही सुरू असल्याचे जाहीरपणे बोलले जाते.

काय करतात एचओडी ?
विभागप्रमुखाचा वरदहस्त असल्याशिवाय सर्व प्रकारच्या ‘कट प्रॅक्टिस’ होऊ कशा शकतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागातील गैरप्रकारांची जबाबदारी कुणाची? खासगी प्रॅक्टिस करणार्‍यांच्या दरवर्षी चौकशा होतात; कारवाई शून्य. निवृत्ती वय 58 वरून 62 झाल्यानंतर आणि दीड-दीड लाखापर्यंत वेतन वाढूनही शिक्षकांच्या हव्यासावर सध्या तरी नियंत्रण नाही.

* शिक्षक, एचओडींच्या वरदहस्ताशिवाय कट प्रॅक्टिस होऊ शकत नाही आणि त्यांनी ठरवल्यास रातोरात ‘कट प्रॅक्टिस’ बंदही होऊ शकते. घाटी एका झटक्यात सुधारू शकते. दुर्दैवाने, घाटीत अलीकडे खूप वाईट प्रथा पडल्या आहेत. त्याला कुठलेही कायदे नव्हे, तर शिक्षकच आळा घालू शकतात. - डॉ. रामदास आंबुलगेकर, माजी विद्यार्थी व निवृत्त वैद्यकीय अधिकारी.

* घाटीत कट प्रॅक्टिस होत नाही. डॉक्टरही खासगी प्रॅक्टिस करत नाहीत. तसे त्यांनी प्रशासनाला लिहून दिले आहे. - डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.