आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी प्रॅक्टिस करणार्‍यांना डीन भोपळेंचे संरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -शहरात खुलेआम खासगी प्रॅक्टिस करणार्‍या घाटीतील डॉक्टरांची चौकशी गोपनीय असल्याचा जावईशोध अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी लावला आहे. मागच्या वर्षी डॉ. छाया दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची चौकशी झाली, अहवाल सादर झाला, असे खुद्द दिवाण म्हणतात; पण कुणाची चौकशी झाली, अहवालात काय, हे म्हणे गोपनीय आहे. सध्या डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली याच डॉक्टरांची चौकशी सुरू आहे.

घाटीमध्ये प्रत्येक प्रकरण दडवून ठेवण्याचाच प्रयत्न होतो. कधी झालीच तर कासवगतीपेक्षा संथ गतीने चौकशी होते आणि कारवाई तर शून्यच. याचे ताजे उदाहरण म्हणजे 23 जानेवारीला नेमलेल्या समितीचे. 21 जानेवारीला मध्यरात्री दोन-अडीच वाजता नेवासा तालुक्यातील एचआयव्ही व कर्करोगाने अतिशय जर्जर झालेल्या महिलेला दाखल करून घेण्यासाठी नातेवाईक टाहो फोडत होते. मात्र घाटीच्या क्रूर डॉक्टरांनी तिला शेवटपर्यंत दाखल करून घेतलेच नाही. घाटी ते कॅन्सर हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते घाटी आणि तिथून ओपीडी, अशी 12 तास अखंड टोलवाटोलवी केली आणि महिलेला जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागल्या. ‘दिव्य मराठी’ने हा प्रकार अधीक्षक गट्टाणींच्या लक्षात आणून दिल्यानंतरच त्या महिलेला दाखल करण्यात आले आणि तिच्या मृत्यूनंतरच समिती नेमण्यात आली. दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली; पण तीन महिन्यांनंतरही कुणावरच कारवाई झालेली नाही. प्रसूती विभागात एका अर्भकाचा बादलीत पडून मृत्यू झाला, त्याविषयीच्या चौकशी अहवालाबाबतही गट्टाणी काही सांगू शकले नाहीत.
सगळे गोपनीय : खासगी प्रॅक्टिस करणार्‍यांची गोपनीय चौकशी सुरू आहे, त्याविषयी सांगता येणार नाही, एवढे बोलून भोपळेंनी फोन ठेवून दिला.
हेच ते डॉक्टर
अनिल धुळे, पवन जाधव, दीपक अग्रवाल, मारुती लिंगायत, सुरेश हरबडे, प्रवीण वासाडीकर, व्यंकट गिते, अजय बोराळकर, आनंद बीडकर, प्रभाकर जिरवणकर, अजय वरे, पंकज अहिरे, वेणुगोपाल रंगू, बी. के. शेवाळकर, संजय पगारे, पी. एल. गट्टाणी, राजन बिंदू, अतुल भालेराव, अमोल जोशी, प्रमोद अपसिंगेकर, अश्विन सोनकांबळे, प्रदीप बेंदरगे.
डॉक्टर उवाच...
० आधी आम्हाला एनपीएविना प्रॅक्टिसची परवानगी दिली होती. सध्या प्रकरण ‘मॅट’मध्ये आहे.
- अनिल धुळे
० पत्नीचे हॉस्पिटल आहे; पण मी प्रॅक्टिस करीत नाही.
- डॉ. पी. एल. गट्टाणी.
० माझ्या पत्नीचे रुग्णालय आहे. तिथे मात्र मी प्रॅक्टिस करीत नाही. - डॉ. वेणुगोपाल रंगू व डॉ. प्रभाकर जिरवणकर
० मी पॅथॉलॉजी लॅब भाड्याने दिली आहे. तिथे डॉ. बिराजदार म्हणून पॅथॉलॉजिस्ट आहे.
- डॉ. राजन बिंदू
० मी प्रॅक्टिस करीत नाही.- डॉ. व्यंकट गिते