आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनाशून्य: घाटीच्या डॉक्टरांची माणुसकी मेली!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औषधांपासून उपचारापर्यंत असंख्य समस्यांनी पोखरलेल्या घाटीची माणुसकीसुद्धा मेल्याचे धक्कादायक आणि विदारक चित्र आज समोर आले. एचआयव्हीने बाधित आणि कर्करोगाने र्जजर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या लोणीतील (नगर) प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयातून आलेल्या महिलेच्या जिवाशी डॉक्टरांनी बारा तास खेळ केला. तिला ‘अँडमिट’ करून न घेतल्याने बोचर्‍या थंडीत रस्त्यावर रात्रभर 12 तास कुडकुडत काढावे लागले.

गंभीर अवस्थेतील महिला रुग्णाची घाटी ते कॅन्सर हॉस्पिटल दोन रुग्णालयांनी अर्धा दिवस टोलवाटोलवी चालवली होती. अमुक एखादा डॉक्टर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगत होता, तर दुसरा एखादा कर्मचारी कॅन्सर हॉस्पिटलहून घाटीत पाठवत होता. त्याच वेळी काही जण ओपीडीमध्ये जाण्याचा सल्ला देत होते. मात्र, सोमवारी (21 जानेवारी) मध्यरात्री दोनपासून ते मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत कुणीही या महिलेला दाखल करून घेतले नाही. दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने हा प्रकार वैद्यकीय अधीक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतरच संबंधित महिलेवर उपचार सुरू करण्यात आले.

वरखेड (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील ही महिला पाच महिन्यांपासून उपचार घेत आहे. गर्भाशयाचा कर्करोग तिसर्‍या स्टेजमध्ये गेल्याने प्रकृती खालावल्याने ती घाटीत उपचारासाठी आली. पण केसपेपर बघून तिला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. ‘आतमध्ये थांबू नका, बाहेर थांबा’, असे बजावण्यात आले. नाइलाजाने महिलेला रस्त्यावर थंडीत रात्र काढावी लागली. केसपेपरवर एचआयव्ही पॉझिटिव्हचा थेट उल्लेख असल्यामुळेच त्या महिलेला अँडमिट केले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

अशी ही टोलवाटोलवी..
संबंधित महिलेस सकाळी सात-साडेसातला डॉक्टर तपासतील, असे नातेवाइकांना अपघात विभागामध्ये सांगण्यात आले. सकाळी रुग्णाला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तिथेच उपचार होतील, असे सांगण्यात आले. तिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेले असता इथे दाखल करता येत नाही, स्टाफ नाही, घाटीमध्येच जा, असे सांगण्यात आले. पुन्हा तिला घाटीत आणले असता, ओपीडीमध्ये दाखवा, असे सांगण्यात आले. ओपीडीमध्ये पुन्हा तोच टोलवाटोलवीचा खेळ सुरू होता. दुपारी साडेबारापर्यंत म्हणजेच ओपीडीची वेळ संपेपर्यंत कुठलीही तपासणी किंवा उपचार सुरू झाले नव्हते. दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने हस्तक्षेप केल्यानंतर सोनोग्राफी, एक्स-रे तपासणी केली.

महिलेला शस्त्रक्रियेची गरज होती व त्यासाठी तातडीने आणण्याची गरज नव्हती. मात्र, बाहेरगावाहून एखादा रुग्ण आलाच तर तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर माणुसकीच्या दृष्टीने दाखल करून घेणे गरजेचे होते. दाखल का करून घेतले नाही ही माहिती घ्यावी लागेल.
-डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

ओपीडीची वेळ संपल्यानंतर गंभीर कर्करुग्ण आला तर तातडीने दाखल करून घ्यावे, असा निर्णय कॉलेज कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत सर्वांना माहिती आहे. मात्र, निवासी डॉक्टरांना या निर्णयाची माहिती नसल्यास असे प्रकार घडू शकतात. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत. -डॉ. अरविंद गायकवाड, सीईओ, कॅन्सर हॉस्पिटल.

कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली
महिला रुग्णावर यापूर्वी उपचार झालेल्या लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने केसपेपरवर थेट एचआयव्ही पॉझिटिव्हचा उल्लेख केला होता. एचआयव्ही रुग्णाची ओळख पटेल, अशी माहिती उच्च् न्यायालयाच्या आदेशानुसार कुठल्याही ठिकाणी किंवा केसपेपरवर लिहिता येत नाही. त्यासाठी वैद्यकीय भाषेत वेगळ्या पद्धतीने उल्लेख केला जातो. मात्र, हा नियम पायदळी तुडवल्याचे या केसवरून स्पष्ट होते.

अखेर ‘ती’ दगावली
शस्त्रक्रिया करण्याची तयारी झाली होती; पण कॅन्सर सर्वांगात पसरल्यामुळे शस्त्रक्रियेचा उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईक महिलेला गावी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला, असे महिलेच्या जावयाने रात्री उशिरा सांगितले.