आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी रुग्णालयाच्या सजिर्कल बिल्डिंगमध्ये ड्रेनेजची गळती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सजिर्कल बिल्डिंगमधील वॉर्ड क्रमांक 13 च्या शौचालयात वरच्या मजल्यावरील शौचालयातील ड्रेनेजची गळती होत आहे. परिणामी रुग्णांच्या अंगावर घाण पाणी पडते, अशी तक्रार नातेवाइकांनी केली आहे. विशेष म्हणजे या वॉर्डातील दोन्ही शौचालयांची तशीच अवस्था असल्याने रुग्णांनी जावे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घाटीची सजिर्कल बिल्डिंग वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असून त्याचा सर्वाधिक त्रास मात्र रुग्ण व नातेवाइकांनाच सहन करावा लागतो. वॉर्ड क्रमांक 13 हा अस्थिव्यंग रुग्णांचा वॉर्ड असून हाडांच्या वेगवेगळ्या विकारांनी त्रस्त रुग्ण दाखल केले जातात. येथे विविध उपचारांसह शस्त्रक्रिया केलेले तसेच शस्त्रक्रिया होणार असलेल्या रुग्णांना दाखल केले जाते. मात्र, या वॉर्डातील दोन्ही शौचालयांमध्ये वरच्या मजल्यावरील शौचालयातील घाण पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे रुग्णांना घाण पाणी अंगावर घेत शौचालयांचा वापर करावा लागतो. तसेच दुर्गंधीचा सामना करावा लागत असून जंतुसंसर्गाची भीती आहे ती वेगळीच! अशा स्थितीत रुग्णांनी जावे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रुग्ण गणपत निकम यांचा मुलगा गोविंद निकम यांनी ‘दिव्य मराठी’कडे केली आहे.
घरातील शौचालयात घसरून पडल्यामुळे गणपत निकम यांच्यावर खुब्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे; परंतु घाण पाण्यामुळे पुन्हा ते घसरून पडले व अजून काही गुंतागुंत निर्माण झाली, तर कोण जबाबदार राहणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत वॉर्डातील कर्मचार्‍यांकडे तक्रार केली तरी काहीच उपयोग होत नाही. म्हणून शेवटी उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांच्याकडे रविवारी (2 फेब्रुवारी) तक्रार केल्याचे गोविंद यांनी सांगितले.

सजिर्कल इमारत परिसरामध्ये घाण-दुर्गंधी कायम
याच सजिर्कल इमारतीमध्ये तळमजल्यावर नेत्र विभाग असून या विभागाच्या शस्त्रक्रिया गृहामध्येच अधूनमधून ड्रेनेजची गळती होते. परिणामी शस्त्रक्रिया थांबवाव्या लागतात. याकडे ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी लक्ष वेधले आहे. संपूर्ण सजिर्कल बिल्डिंगच्या तिन्ही बाजूंनी ड्रेनेजलाइनच्या पाइपमधून घाण पाणी सतत वाहत असते. दुर्गंधीही सहन करावी लागते. त्याशिवाय इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळतीचा प्रश्नही मोठा आहे. मात्र, कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाकडून पावले उचलली जात नाहीत.

बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार
वॉटर प्रूफिंग केल्यानंतरही गळती होत आहे. यासंबंधी बांधकाम विभागाशी सातत्याने पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र, विभागाकडून प्रश्न सोडवला जात नाही. या प्रश्नी पुन्हा एकदा विभागाला कळवण्यात येईल. डॉ. अविनाश मगरे, वैद्यकीय उपअधीक्षक, घाटी.