आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghati Hospital Mdr Tb Lab Work Pending Aurangabad

एमडीआर-टीबी लॅबचे काम कासवगतीने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नेहमीच्या औषधांना प्रतिसाद न देणार्‍या आणि अतिक्लिष्ट एमडीआर-टीबी रुग्णांचे निदान करता येणार्‍या एमडीआर-टीबी लॅबच्या कामासाठी दीड वर्षांपूर्वीच 37 लाखांचा निधी केंद्र सरकारकडून मिळाला आहे. या लॅबचे काम काही झाले तरी डिसेंबरअखेर पूर्ण होणारच, असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र नुकतेच काम सुरू झाले असून, अजून किमान महिना-दोन महिने काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

क्षयरोगावरील (ट्यूबरक्यूलॉसिस, टीबी) नेहमीच्या औषधींना प्रतिसाद न देणार्‍या अतिगंभीर क्षयरोगास मल्टिड्रग रेझिस्टंट ट्यूबरक्यूलॉसिस (एमडीआर-टीबी) असे म्हटले जाते. अलीकडे एमडीआर-टीबीचे रुग्ण देशभर सगळीकडेच वाढत असून, त्याच्या निदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत ‘जीन एक्स्पर्ट’ हे महागडे व अतिशय महत्त्वाचे उपकरण अलीकडेच उपलब्ध झाले आहे. मात्र या उपकरणाद्वारे ज्या रुग्णांचे निदान होत नाही व ज्यांना एमडीआर-टीबी असण्याची वैद्यकीय शक्यता असते, अशांचे शंभर टक्के निदान एमडीआर-टीबी लॅबमध्ये होणार आहे. त्यामुळेच या लॅबचे महत्त्व अनन्यसाधारण असून, केंद्राने त्यासाठी 37 लाखांचा निधी दीड वर्षापूर्वीच दिला आहे. ही लॅब घाटीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत कार्यरत राहणार असून, मुंबई-पुणे-नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथी लॅब असेल. मात्र दीड वर्षाच्या कालावधीत ही लॅब पूर्णपणे कार्यान्वित होणे अपेक्षित असताना, आतापर्यंत नुकतेच काम सुरू झाले आहे. लॅबचे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान काही महिने लागणार, अशी चिन्हे आहेत.

‘जीन एक्स्पर्ट’वर शंभरावर तपासण्या
जीन एक्स्पर्ट या उपकरणावर मागच्या महिन्यापासून आतापर्यंत सुमारे शंभर तपासण्या झाल्या आहेत. या तपासण्यांसाठी जिल्हा पातळीवरील नमुने येत असून, सकाळी नमुना दिल्यास संध्याकाळपर्यंत रिपोर्ट मिळू शकतो, असेही विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

जानेवारी मध्यापर्यंत एक भाग होईल
काही तांत्रिक अडचणी आल्याने एमडीआर-टीबी लॅबचे काम लांबले. मात्र लॅबचा एक भाग जानेवारी मध्यापर्यंत पूर्ण होईल व तो कार्यान्वित होईल, अशी आशा आहे. संपूर्ण लॅब कधी उभी राहील, हे सांगता येणे कठीण आहे. मात्र त्यासाठी निधीची अडचण येणार नाही. डॉ. अजित दामले, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, घाटी.