आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghati Hospital Sonography Machine Start Aurangabad

घाटीतील तातडीचे सोनोग्राफी मशीन सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीच्या स्त्रीरोग विभागात गर्भवती महिलांची तातडीची सोनोग्राफी तपासणी मोठय़ा प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. परिणामी, अत्यवस्थ गर्भवती महिलांना दोन जिने खाली उतरून तपासणीसाठी ताटकळावे लागणार नाही. तसेच झटके येणार्‍या गर्भवती महिलांसाठी ‘एक्लामशिया रूम’ही कार्यान्वित झाली आहे. ‘दिव्य मराठी’ने या संदर्भात अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन उशिरा का होईना निदान तातडीची तपासणी सुरू झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात यापूर्वी एकही सोनोग्राफी उपकरण नसल्यामुळे गर्भवतींच्या दैनंदिन तसेच तातडीच्या सोनोग्राफी तपासणीसाठी तळमजल्यावरील क्ष-किरण विभागात जावे लागत होते. आता प्रसूती कक्षात हे उपकरण कार्यान्वित झाल्यामुळे निदान तातडीच्या रुग्णांची पळापळ थांबली आहे. मात्र दैनंदिन तपासणीसाठी पुन्हा क्ष-किरण विभागात महिना-पंधरा दिवसांचे ‘वेटिंग’ गर्भवतींच्या नशिबी आहेच.

‘एक्लामशिया रूम’मुळे घटणार मृत्युदर
‘टर्न की प्रोजेक्ट’अंतर्गत स्त्रीरोग विभागातील प्रसूती कक्षात अलीकडेच अत्याधुनिक ‘एक्लामशिया रूम’ तयार करण्यात आली होती. यात मॉनिटर, इन्फ्युजन पंप, कार्डिओ टोमोग्राफी मशीन ही उपकरणे रक्तदाब वाढून झटके (एक्लामशिया) येणार्‍या गर्भवतींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण अजून कमी होऊ शकते. ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून ‘एक्लामशिया’च्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असेही विभागप्रमुख डॉ. येळीकर यांच्यासह डॉ. गडप्पा यांनी सांगितले.

एकाच वेळी आता दहा महिलांच्या प्रसूती
‘टर्न की प्रोजेक्ट’अंतर्गत स्त्रीरोग विभाग आता सुसज्ज झाला आहे. येथील सर्व सुविधा आता कार्यान्वित झाल्या आहेत. सद्य:स्थितीत प्रसूती कक्षात एकाचवेळी आठ महिलांच्या नैसर्गिक प्रसूती, तर दोन महिलांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया होऊ शकतात. डॉ. कानन येळीकर, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग.