औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अर्थात घाटीच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेत पुन्हा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार चंद्रकांत खैरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तसे पत्रही देण्यात आले. परंतु आता अचानक खैरे यांना हटवून तेथे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री रामदास कदम यांनी इम्तियाज यांना तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे सेनेत पुन्हा एकदा कदम विरुद्ध खैरे असा कलगी-तुऱ्याचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
एक महिन्यापूर्वीच खैरे यांना घाटीच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर खैरे यांनी अन्य सदस्यांचीही नियुक्ती केली. लवकरच समितीची बैठक लावण्याच्या हालचाली सुरू असतानाच पालकमंत्र्यांच्या गोटात वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे समोर आले. खैरे यांना हटवून हे अध्यक्षपद इम्तियाज यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे समजते. मी मागणी केली होती. परंतु अजून मला नियुक्तिपत्र मिळाले नाही, असे इम्तियाज यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. हा वाद अजून चव्हाट्यावर आला नसला तरी कार्यकर्त्यांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी पालकमंत्री कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांचा स्वत:चा मोबाइल बंद होता. तीन स्वीय सहायकांमार्फत संपर्क साधला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
कदम नॉट रिचेबल
संतप्त खैरे म्हणाले, मला बोलायचे नाही
पालकमंत्र्यांच्या वर्तुळात काय चालले आहे, याची कल्पना खासदार खैरे यांना आली असावी. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते संतप्त होते. या विषयावर मला काहीही बोलायचे नाही. अशा समित्यांवर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असतात एवढेच मला माहिती आहे, असे सांगतानाच तुम्हाला हे ज्याने कोणी सांगितले त्यालाच का विचारत नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
अशी कारणे पुढे
खैरेयांना या समितीच्या अध्यक्षपदावरून का हटवले गेले, असा प्रश्न उद्या उपस्थित केला जाईल, याची कल्पना रामदास कदम यांना आहे. त्यामुळे काय कारणे द्यायची याची रूपरेषाही ठरल्याचे समोर आले आहे. खैरे हे केंद्र तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांवर आहेत. जिल्हा दक्षता समितीचेही ते अध्यक्ष आहेत. एवढ्या मोठ्या व्यापात ते घाटी रुग्णालयाला वेळ देऊ शकणार नाहीत. त्यामुळे वेळ असलेला लोकप्रतिनिधी द्यावा, असे कारण यासाठी पुढे करण्यात येत असल्याचे समजते.
दरम्यान, घाटीच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष होण्याची इम्तियाज यांची इच्छा असल्याचे स्पष्ट होते. ते म्हणाले, मी घाटीच्या शेजारीच राहतो. हे रुग्णालय माझ्या मतदारसंघातच आहे. मला या रुग्णालयाबद्दल आपुलकी आहे, कारण माझे वडील तेथे डॉक्टर होते. खैरे हे अनेक केंद्रीय समित्यांवर आहेत. त्यामुळे ते कितपत वेळ देऊ शकतील, यावर शंका आहे. माझ्याकडे जबाबदारी आल्यास मी या रुग्णालयाचा कायापालट करू शकतो. मात्र, यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे जर पद नाही मिळाले तरी मी काम करतच राहील, असे इम्तियाज यांनी सांगितले. थोडक्यात, या समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी यासाठी कदम यांची भेट घेतली होती.