आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीमधील पाणी प्रश्नावर तोडगा काढा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीच्या पाणीप्रश्नासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठाता, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी बैठक घ्यावी व तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच याबाबत एका आठवड्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. भूषण गवई व न्या. एम. टी. जोशी यांनी बुधवारी दिले.
घाटीतील रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या तुलनेत कमी झालेल्या पाणीपुरवठ्याविषयी दै. ‘दिव्य मराठी’ने 2 नोव्हेंबर रोजी ‘घाटीलाच जीवन मिळेना’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. खंडपीठाचे न्या. एस. बी. देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’चे वृत्त स्युमोटो याचिका म्हणून दाखल करून तिला जनहित याचिका म्हणून मान्यता देण्याची मागणी मुख्य न्या. मोहित शहा यांच्याकडे केली होती. मुख्य न्यायमूर्तींनी जनहित याचिका नियम 2010 चे कलम 4 (बी) नुसार मान्यता प्रदान केली होती. याचिकेत 14 डिसेंबर 2011 रोजी न्या. गवई व न्या. जोशी यांनी अ‍ॅड. अनिरुद्ध निंबाळकर यांना न्यायालयाचा मित्र (अ‍ॅमिकस क्युरी) म्हणून नियुक्त केले होते. अ‍ॅड. निंबाळकर यांनी 21 डिसेंबर 2011 रोजी याचिकेचा मसुदा तयार केला होता. घाटीला रोज आठ लाख लिटर पाण्याची गरज असून त्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असल्याचे याचिकेत म्हटले होते. याचिकेत खंडपीठाने महापालिका व राज्य शासनास 11 जानेवारीला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. 11 जानेवारी रोजी महापालिका व राज्य शासनाने वेळ मागून घेतला होता. त्यानंतर बुधवारी (18 जानेवारी) झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने व महापालिकेने म्हणणे सादर केले. या संदर्भात घाटीचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा आणि आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश खंडपीठाने दिले.
‘मेडिसिन बिल्डिंग’ला गरज अडीच लाख लिटर पाण्याची! - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला रोज आठ लाख लिटर पाण्याची गरज आहे. यातील नूतन मेडिसिन बिल्डिंगला अडीच लाख लिटर पाण्याची गरज पडणार आहे. मेडिसिन विभागाचे दहा वॉर्ड एकाच इमारतीमध्ये येणार असल्यानेच अधिक पाण्याची गरज पडणार आहे. तसेच घाटीत मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात.