औरंगाबाद - माजी महापौर अनिता घोडेले (१०६, कांचनवाडी-नक्षत्रवाडी) आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले (१०७-विटखेडा) या दांपत्याला शिवसेनेने या वेळी अधिकृत उमेदवारी दिली. एकाचे दोन झालेल्या या वाॅर्डात नंदकुमार घोडेले यांचा वरचष्मा आहे. येथून ते बिनदिक्कत निवडून येतील, असा अहवाल गेल्यानंतरच सेनेच्या वतीने प्रथमच पती-पत्नीला उमेदवारी देण्यात आली. घोडेले यांच्या जनसंपर्काचा अंदाज असल्याने काँग्रेसने या दोन्हीही वाॅर्डांत उमेदवार दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकाला पुरस्कृत केले आहे.
२०१० च्या निवडणुकीत सेनेने नंदकुमार घोडेले यांनी पदमपुरा वाॅर्डातून उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे अनिता घोडेले कबीरनगर वाॅर्डातून अपक्ष म्हणून लढल्या. पुढे त्या महापौरपदी विराजमानही झाल्या होत्या. या वेळी विटखेडा हा ओबीसी सर्वसाधारण, तर कांचनवाडी-नक्षत्रवाडी हा वाॅर्ड महिला ओबीसी आरक्षित झाला. घोडेले दांपत्याने दोन्ही वाॅर्डांसाठी मुलाखती देत पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. या वेळी शिवसेनेच्या वतीने तटस्थपणे प्रत्येक वाॅर्डात सर्वेक्षण करण्यात आले होते. या दोन्हीही वाॅर्डांत मतदारांनी घोडेले दांपत्यालाच कौल दिल्याचे सांगण्यात येते, तरीही शेजारच्या वाॅर्डात पती-पत्नीला उमेदवारी कशी मिळेल, असा प्रश्न होता; परंतु पक्षाने विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले. घोडेले यांच्या विरोधात अन्य पक्षातून कोणीही समोर आले नव्हते. उमेदवारच न मिळाल्याने काँग्रेसने येथून उमेदवार दिले नाहीत. राष्ट्रवादीने विटखेड्यातून एकाला पुरस्कृत केले. नंदकुमार घोडेले एक वेळा, तर अनिता घोडेले दोन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत. या वेळी हे दोघेही नगरसेवक म्हणून पालिकेत जातात का, याकडे मतदारांबरोबरच राजकीय जाणकारांचेही लक्ष लागले आहे. तसे झाले तर महानगरपालिकेत हा एक इतिहास असेल. सक्षम उमेदवार नसल्याने आम्ही अपक्षाला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले.
पुढे वाचा... महिलांचे प्रश्न सोडवणा-या पदाधिकारी हव्या