आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत उकळत्या पाण्याने भाजून बालिकेचा करुण अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इलेक्ट्रिक शेगडीवर आंघोळीसाठी ठेवलेले उकळते पाणी गादीवर पडल्याने वैष्णवी शिंदे या चार महिन्यांच्या बालिकेचा भाजून मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन परिसरातील राहुलनगरमध्ये बुधवारी (28 ऑगस्ट) पहाटे ही घटना घडली.

मृत बालिकेचे आई-वडील मजुरी करून चरितार्थ भागवतात. बाबासाहेब शिंदे यांचा उषासोबत दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर वैष्णवी जन्मली. बाबासाहेब यांचे वडील भीमराव, आई शांताबाई आणि भाऊ सुभाष हे सर्वजण एका छोट्याशा खोलीत राहतात. भीमराव यांच्याकडे दोन म्हशी असून ते अनेक वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करतात. खोलीच्या मागच्या बाजूला स्नानगृहाऐवढी आणखी एक खोली असून तेथेच जमिनीपासून अर्धा फुटावर शेगडी बसवलेली आहे. उषा आपल्या मुलीसोबत शेगडीजवळ जमिनीवर गादी टाकून झोपते. 27 ऑगस्टलाही ती वैष्णवीसोबत झोपली. मात्र, 28 ऑगस्टला पहाटे आजोबांना दूध वाटप करण्यासाठी घराबाहेर पडायचे होते. त्यामुळे त्यांनी शेगडीवर अंघोळीसाठी पाणी ठेवले. साडेपाच ते सहाच्या दरम्यान शेगडीवर दूध ठेवल्यासारखा भास झाल्यामुळे दोन मांजरी आपसात भांडत शेगडीजवळ आल्या, त्यानंतर क्षणार्थात त्यातील एक मांजर उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडली. त्यामुळे पातेले वैष्णवी झोपलेल्या गादीवर सांडले. कापसापाच्या गादीने उकळते पाणी शोषले, आणि बालिका भाजली. दरम्यान झोपेत उषाच्या पायाला चटके लागल्यामुळे जाग आली, तोपर्यंत वैष्णवीचे शरीर भाजले होते. मांजरही जागीच दगावली. याप्रकरणी सातारा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घाटीत जाण्याआधी ओढवला मृत्यू
शेजारी कैलास महाजन यांच्या मदतीने बालिकेला रेल्वेस्टेशन परिसरातील कोठारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बुधवारी उपचाराचा प्रयत्न केला, पण प्रकृती सुधारत नसल्याने तिला घाटीत नेण्याचा सल्ला देण्यात आला. पहाटे साडेपाचदरम्यान घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.