आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग पाहण्याआधीच तिच्या नशिबी दुनियादारी! सापडली अडीच महिन्यांची निरागस चिमुरडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकलीची काळजी घेताना परिचारिका नीता एडतकर. छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
चिमुकलीची काळजी घेताना परिचारिका नीता एडतकर. छाया : रवी खंडाळकर
औरंगाबाद - स्त्री जन्म घेऊन तिला पुरते अडीच महिनेच झाले. आईची कूस हेच तिचे विश्व. मात्र तिला वयाच्या अडीचव्या महिन्यातच दुनियादारीचा अनुभव घ्यावा लागला. आरटीओ मैदानासमोरील एका शेताच्या झुडपात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही चिमुरडी बेवारस अवस्थेत सापडली. घाटी रुग्णालयातील परिचारिका आणि छावणी ठाण्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल तिची काळजी घेत आहेत. छावणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली अाहे.

आरटीओ मैदानाजवळील करणसिंग काकस यांच्या शेतातील एका झुडपातून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेतात काम करणाऱ्या निर्मला बलगे यांचे पाय त्या झुडपाच्या दिशेने वळाले. त्या जसजशा जवळ जात होत्या तसतसा बाळाच्या रडण्याचा आवाज आणखी स्पष्ट एेकू येत होता. त्यांनी धावतच झुडूप गाठले आणि टाहो फोडणाऱ्या त्या तान्हुलीला कुशीत घेऊन शांत केले. लक्ष्मण देशमुख यांना ही माहिती पोलिसांना दिली. माहिती कळताच चार्ली पथक आणि छावणी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ या चिमुकलीला उपचारासाठी घाटीत दाखल केले. वाॅर्ड क्रमांक २५ मधील परिचारिका नीता एडतकर, प्रीती निर्मल, महिला पोलिस कर्मचारी सुरय्या पठाण यांनी या चिमुकलीला मायेची ऊब दिली. उपचार सुरू होताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अज्ञात आईच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
पुढे वाचा... रडल्यामुळे दुर्घटना टळली