आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर: विहिरीत पडून विद्यार्थिनीचा मृत्यू, टंचाईमुळे जीव गमवावा लागला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- गंगापूर तालुक्यातील खडक नारळा येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

घटनेबाबत शिल्लेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खडकनारळा (ता. गंगापूर) येथील रहिवासी कोमल लक्ष्मण कुऱ्हाडे (१७) ही शालेय विद्यार्थिनी आपल्या आईसोबत स्वतःच्या मालकीच्या शेतातील गट नंबर तीनमधील विहिरीवर कपडे धुण्यासाठी सकाळी वाजता गेली होती. विहिरीतून बादलीने पाणी शेंदताना कोमलचा पाय घसरून ती विहिरीत पडली. नंतर ही घटना आईच्या लक्षात आल्यानंतर आईने आरडाओरड सुरू केली, जवळपास तासभर कोमल विहिरीत पडून होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिल्लेगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तिला लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. नंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. 

महिनाभरापासून येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी मागील महिन्यात प्रस्ताव सादर केला असून अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लवकरच टंचाईवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गंगावणे, युनूस शेख, भारत तमनर करीत आहेत. 

गेल्या महिनाभरापासूनखडकनारळा येथे पाणीटंचाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. अशातच येथील मुलीलादेखील पाणीटंचाईमुळे जीव गमवावा लागला ही दुर्दैवी घटना घडली. 
- एम.डी थोरात, अध्यक्ष, शालेय समिती, खडक नारळा 
बातम्या आणखी आहेत...